मंगळवार, ४ जून, २०१३

दीन दुबळे दिन

सध्या वेगवेगळ्या ‘डे’जचे दिवस सुरू आहेत. कॉलेज कॅम्पसमध्ये रोज डे, मिसमॅच, ट्रडिशनल डे इ. इ. तर बाकीच्या समाजात मराठी भाषा दिन, विज्ञान दिन इ. उद्याच ‘जागतिक महिला दिन’ही साजरा होईल. असे वेगवेगळे दिवस साजरे व्हायला हवेत. कारण आपली संस्कृतीच उत्सवी संस्कृती आहे. त्या निमित्ताने का होईना आपल्याला वेगवेगळ्या विषयांची आठवण होते, हेही नसे थोडके नाही का?

मग प्रश्न असा येतो की डेज झाले, पुढे काय म्हणजे कॉलेजमधले डेज सोडून देऊ. ते फक्त मौजमजेसाठीच असतात. पण बाकीच्यांबाबतीत नक्की काय घडते. मराठी दिनाचेच उदाहरण घेऊ. गेली पाच-सहा वर्षे ब्लॉगविश्वाचा धांडोळा घेतला तर दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठीबाबत ढीगभर चर्चा होते. ब्लॉगविश्वामुळे मराठीला नवी चालना मिळाली वगैरे चर्चेचे ढोल पिटले जातात, पण या पाच-सहा वर्षांत ब्लॉगविश्व कसं बदललं यावर काही चर्चा नसते. आज हे विश्व आणि त्यावरचं लिखाण इतकं समृद्ध झालंय की, त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. पण आपण कौतुकाच्या पुढे जातच नाही. किंवा कदाचित आपल्याला जायचे नसावे. कारण एक फेब्रुवारी सरला की पुढचा फेब्रुवारी येईपर्यंत मराठीचा मुद्दा कुठे गायब होतो हेच कळत नाही. (राजकारणासाठी वापरले जाणारे मराठीपण आणि हे मराठी पण वेगळे बरं का!)

हीच गोष्ट विज्ञान, दिनाची... यादिवशी शाळा-कॉलेजांत कार्यक्रम होतात. भारतीय विज्ञानाचे गोडवे गायिले जातात. वेगवेगळे सत्कार, भाषणे बरेच काही असते आणि मग हा ज्वर ओसरला की, परत भारतात नोबेल विजेता शास्त्रज्ञ का तयार होत नाही? अशा चर्चा परिसंवादात घडू लागतात. आपणच स्वतःला किती कॉन्ट्राडिक्ट करतो नाही? भारतातले सारे लोक संशोधनासाठी बाहेरच का जातात? त्यांना इथे थांबावेसे का वाटत नाही? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे आपण कायमच टाळत आलोय. संशोधनासाठी लागणारा पैसा, सर्वसुसज्ज लॅब्स या गोष्टी तरी आपल्या हातात नाहीत, पण आहे त्या साधनसामग्रीमध्ये आपल्या लोकांचं जगणं सोपं होईल असं काही करावसं का वाटत नाही? युजीसीची ग्रँट मिळावी म्हणून प्रोजेक्ट करायचा, अशी मनोवृत्ती वाढताना दिसते आहे. त्याचं मूळ कुठे आहे? मॉडर्न सायन्सेस जाऊ दे, पण भारतीय संस्कृती आणि विज्ञान यावर काम करता येईल. कदाचित या सगळ्यावर काम सुरूही असेल, पण जेवढा ‘विज्ञान दिन’ चर्चेत येतो तेवढं हे सगळं का येत नाही?

‘महिला दिना’चं तर या सगळ्यांहून भारी असतं. लोक तोंडावर बोलतात ७ मार्चला. ‘आज काय तुमचा दिवस आहे. एन्जॉय करून घ्या. नंतर वर्षभर कोण विचारतंय?’ मग. बाकी फुकाच्या चर्चा काय कामाच्या? ‘स्त्रीवाद्यांना बोलायला संधी मिळण्यासाठी चांगला दिवस एवढेच काय ते त्याचे मत्त्व. ‘निर्भया’ या इश्युमध्ये खूप गाजला आता. या आठवड्यातही चर्चा होईल, पण शेवटी आउटपूट काय मिळाले? काहीच नाही. कायद्याला कोणाचे नाव द्यावे, यावर झालेल्या वायफळ चर्चा आणि काही कँडल मार्च. शेवटी सगळं ‘जैसे थे’च. मग असे किती ८ मार्च आले आणि गेले, तरी कॉमन मॅनच्या आयुष्यात असा कितीसा फरक पडणार आहे?

असे दिवस असावेतच, पण त्यांचे महत्त्व नक्की किती ते ठरवायला हवे. कारण असे डेज सेलिब्रेट केले की, आपली त्या त्या विषयातली जबाबदारी संपली, असे सा‍ऱ्यांना वाटू नये. एवढंच नाही तर आता जे चारजण नेटाने काम करत आहेत, तेही करायचे थांबवतील. असे दिवस महत्त्वाचे आहेत. त्या त्या विषयात काम करणा‍ऱ्या लोकांचे कार्य जगासमोर आणणे, जनजागृती करणे असे उद्देश त्यामुळे साध्य होतात, पण हा फक्त स्टार्टिंग पॉइंट झाला, यानंतर वर्षभर काही भरीव काम झालं तर तो दिवस खरा सार्थकी लागला म्हणायचा नाही तर काय, दररोज एखादा ‘डे’ असतोच की!

असं म्हणतात की, एखादं हत्यार सारखं सारखं वापरलं की, त्याची भीती नाहीशी होते. आजकाल संपांबाबत तसंच झालंय. तसं असे ‘दिन’ काय दररोजच असतात, त्याचं काय विशेष असं ‌भविष्यात म्हटलं जाऊ नये आणि ‘दीन दुबळे दिन’ होऊ नयेत यासाठी.

विनायक पाचलग
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा