आजकाल कोणतंही वृत्तपत्र उघडलं तरी नाटक, सिनेमाच्या जाहिरातीचं पान पाहिल्यावर मनात एक खंत येते. कराड, सांगली, मिरज, इचलकरंजी इथं ही सगळी नाटकं येतात, पण जरा पुढं जाऊन कोल्हापूरकडं त्यांचे पाय काही वळत नाहीत. काय लोचा आहे माहीत नाही, पण ही लोकं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तालुक्यांत येतील, पण शहरात फिरकत नाहीत. व्वा गुरू ! चांगलं नाटक कोल्हापुरात पाहून खूप दिवस झाले अशी स्थिती आहे. आज येईल, उद्या येईल अशी कलाप्रेमी रसिक वाट पाहतो आहे, पण कसलं काय? दोनदा जिल्ह्यातही नाटकं येऊन गेली.
या परिस्थितीची कारणं शोधायचा प्रयत्न केला, तर बऱ्याच गोष्टी दिसतील. सगळ्यात सोपं कारण म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहाची दुरवस्था. हे कारण दिलं की, सगळे लोक आपापली जबाबदारी झटकायला मोकळे. केशवराव भोसले नाट्यगृह सर्वोत्कृष्ट अवस्थेत नाही हे मान्य, पण त्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपापल्या पातळीवर प्रयत्न तर करत असतील ना! आणि जर दुर्दैवाने नसतील तर त्यांना काम करायला लावायची जबाबदारी कोणाची? आपलीच ना? विक्रम गोखले मध्यंतरी इथं येऊन गेले. त्यांनी हा मुद्दा आपल्याला सांगायची वेळ का यावी? हा प्रश्नच आहे. नाट्यगृहातली दुरवस्था हे कारण तसं तकलादू वाटतं. कारण जिथं धड विंगा नाहीत, अशा ठिकाणी लोक नाटक बघायला जातात. त्या मानानं केशवराव भोसले नाट्यगृह कितीतरी बरं, मग घोडं अडतं कुठं?
आजकाल नाटक चालत नाही, नाट्य व्यवसायाला अवकळा आली आहे, ही कारणं तर फारच बेगडी आणि जुनी झाली. मुंबईचे एखादे वर्तमानपत्र उघडले तर चार-चार पानं जाहिराती नाटकांच्या असतात. सत्तरएक नाटकं रंगमंचावर आहेत. म्हणजे नाटकं तर सुरू आहेत. उलट, सिनेमातले कलाकार नाटकात येत आहेत. नाट्य परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान होण्यापर्यंत मजल गेली आहे. याचा अर्थ नाटकात पैसा आहे. कारण, तोट्याच्या सौद्यात इतके जण एवढी वर्षे कधी राहत नाहीत. याचाच अर्थ असा की, अवकळा वगैरे काही आलेली नाही. मग, उरतो तो मुद्दा... प्रेक्षकांचा. नाटक हा दोघांचा खेळ आहे. इथे एक परफॉर्मन्स असून भागत नाही. निदान एक प्रेक्षक तरी असावा लागतो. म्हणजे प्रॉब्लेम आहे तो प्रेक्षकांचा. रादर दर्जेदार प्रेक्षकांचा.
परवा, माझ्या ओळखीचे काही जण नाटकाला गेले होते. नाटक पाहून आल्यावर त्यांनी नाटकाचं तोंडभरून कौतुक केलं. म्हटलं एवढं चांगलं नाटक होतं, तर प्रेक्षकही भरपूर असतील. पण विचारलं तेव्हा कळलं की, कसेबसे ६० लोक असतील. प्रायोगिक नाटकांचं एवढ्यावरदेखील भागलं असतं, पण हे तर व्यावसायिक नाटक. शेवटी त्यांच्याही पोटाचा प्रश्न आहे. वितरकही तेच कारण सांगतात. शनिवार, रविवार नाटकांना मिळणे आधीच दुरापास्त. त्यात, नाटकाचा प्लॅन तरी भरायला हवा. तोच जर का भरत नसेल तर मोठमोठ्या नाटकांचे आणि त्यातल्या सुप्रसिद्ध कलाकारांचे मानधन भागायचे तरी कसे ? बुकिंग नाही म्हणूनच असेल कदाचित. पण परवाच, ‘महासागर’सारखं चांगलं नाटक कॅन्सल झालं. एक-दीड वर्षापूर्वी ‘शंभूराजे’ असंच कॅन्सल झालं होतं आणि आयत्यावेळी लावणीचा शो मात्र हाउसफुल्ल झाला होता. असं का? माझा लावणीला विरोध नाही. तीही एक उत्तम कला आहे, पण फक्त लावणी नको, नाटकही असूदे.
मग प्रेक्षकांचं हे गणित नक्की बिनसलं तरी कुठं आणि कधी ? कारण पूर्वीपासून बरीच चांगली नाटकं इथे झाल्याचे ऐकिवात आहे. बऱ्याच कलाकारांच्या आत्मकथनात त्याचा उल्लेख आहे. मग आताच एवढा प्रेक्षकांचा दुष्काळ का? बरं, हा दुष्काळही कायम आहे, असंही म्हणता येत नाही. नुकतीच राज्य नाट्य स्पर्धा हाउसफुल्ल होऊन गेली. मध्यंतरी ‘वाऱ्यावरची वरात’ देखील हाऊसफुल्ल होऊन गेलं. काही ठरलेले कार्यक्रम तर नेहमी प्रेक्षकांची गर्दी खेचतात, पण इतरवेळी प्रेक्षक शोधावा लागतो हे कोडं काही केल्या सुटत नाही. बरं, कोल्हापुरात पैशांची अडचण आहे अशीही स्थिती नाही. शिवाय प्रत्येक वितरकाने वेगवेगळ्या योजना काढल्या आहेत. ज्यात तुम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त नाटकं पाहू शकता. पण, त्यांनाही प्रतिसाद म्हणावा तसा नाहीच. नाटकाचं कल्चर पुन्हा एकदा कुठंतरी रूजवायला हवं एवढं मात्र नक्की.
अर्थात, केवळ बोलणंही काही कामाचं नाही. कृतिशील बडबड कामाची, पण यानिमित्तानं चार लोकांनी विचार केला, तरी तेही पुरेसं आहे.
तोपर्यंत मात्र ‘नटसम्राट’मधल्या आप्पा बेलवलकरांच्या ‘कोणी घर देता का घर?’सारखं मी म्हणत राहीन की, सामान्य प्रेक्षकाला ‘कोणी नाटक दाखवता का नाटक?’.
विनायक पाचलग
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा