मंगळवार, ४ जून, २०१३

कला बघायची कला

एका कॅनव्हासवर हिरवा रंग, त्यावर तीन-चार रेघोट्या असं एखादं चित्र मध्येच नजरेत येतं. कडेला लिहिलेले असते, चित्राची १० कोटीला विक्री... वगैरे वगैरे... असं काय असतं त्यात ते कळत नाही. एखाद्या मुझियममध्ये माणसं तास-दोन तास एखाद्या शिल्पासमोर थांबतात. दुसरा मात्र पाच मिनिटांत बघून निघून जातो. मी अधूनमधून शाहू स्मारकला जातो, तेव्हा कोणते ना कोणते तरी प्रदर्शन नेहमी सुरू असतेच, पण मला सगळीच प्रदर्शने भारीच वाटतात. कधी उन्नीस-बीस करायला जमतच नाही.

याला कारण एकच, ते म्हणजे कला बघायला सुद्धा स्कील लागते आणि ती प्रत्येकाजवळ असतेच असे नाही. शेवटी कोणतीही कला व्यक्तीच्या इमॅजिनेशनवरच अवलंबून असते. एखाद्याला एखाद्या तलावाचे चित्र फक्त पाण्याचा एक साठा असलेलं चित्र वाटेल, तर कोणाला त्यात निरव शांतता दिसेल. सगळाच अॅबस्ट्रॅक्ट खेळ. आमच्यासारख्या पोरांना शास्त्रीय संगीत म्हणजे फक्त ओरडणे आणि हातवारे वाटतात, तर आधीच्या पिढीला रॉक म्हणजे केवळ ओरडणे वाटते ते त्यामुळेच.

चर्चेचा मुद्दा हाच की, एखादी कलाकृती अनुभवायला आपणही तेवढे ताकदीचे असावे लागतो, पण ही बघायची कला आणायची तरी कशी? म्हणजे ही काही पाठ्यपुस्तकातून शिकण्यासारखी नाही. पण, आपण वैयक्तिक तरी याबाबत काही करतो का?

आपण म्हणतो की, ऐकणाऱ्याचे कान तयार आहेत, पण त्यामागे त्याने वेगवेगळे संगीत ऐकण्यात घालवलेले हजारो तास असतात. ते मात्र आपल्याला दिसत नाही. आजकाल बरेच जण वेगवेगळ्या महोत्सवांना येतात आणि कानसेन असल्याच्या थाटात हातवारे करत राहतात. मग, बऱ्याचदा हसू आवरत नाही. त्यापेक्षा आधी शांतपणे येऊन ऐकायचा आणि शिकायचा प्रयत्न केला तर काय जाते कोणास ठाऊक ? मी फक्त या कलाकाराचे पाहिले, ऐकले असे सांगायला मिळावे म्हणून येणारे किती तरी जण असतात. अर्थात हे सगळं वैयक्तिक पातळीवर चालूनही गेलं असतं, पण अशांमुळे गोची अशी होते की, एखाद्या कलेबाबत आपल्याला आस्था निर्माण होतच नाही किंवा मग आपण हिमेश रेशमिया आणि किशोर कुमार यांना समानच मानू लागतो.

पण, मग कला समजून घ्यायची नजर नक्की तयार करायची कशी? मला वाटतं की, आपल्या आजूबाजूला तसं वातावरण तयार करून आपण ते कमवू शकतो. म्हणजे, मला सांगा, आपण वर्षभरात नक्की किती कार्यक्रमांना जातो? त्यातले अगदी जाणीवपूर्वक आपण किती कार्यक्रम ऐकतो, प्रदर्शने पाहतो? आपल्या आजूबाजूच्यांना किंवा पुढच्या पिढीला जाणीवपूर्वक एखादे नाटक, कार्यक्रम दाखवतो का? अगदी माझीच गोष्ट, परवापर्यंत मला लकी बझारच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर एक संग्रहालय, कलादालन आहे हे माहीत नव्हते. टीनएजरना या सगळ्यांची ओढ लावायला हवी. एकदा ही सारी मनाची कवाडे खुली झाली की, कोणतीही कला मनापासून समजून घेता येईल, नाही का?

जसे कलाकार घडविण्यासाठी वर्कशॉप्स असतात, तसे खरे तर उत्तम रसिक घडविण्यासाठीही असायला हवेत. परदेशात बऱ्याच ठिकाणी असले टी क्लब वगैरे असतात. तिथे वेगवेगळ्या कलाकृतींवर भरभरून चर्चा होते. अगदी, रात्ररात्रभर भांडणे होतात. एवढं फॉर्मल राहू दे, पण असलं काहीतरी आपणही सुरू केलं तर. कारण चार माणसं एकत्र आली की, आपण फक्त हवापाण्याच्या गप्पा मारतो. बहुधा... त्यापुढं जाऊन काही केलं तर खरेच एक कल्चर डेव्हलप होऊ शकतं.

शेवटी कोणत्याही कलेचे देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, असे स्वरूप असते. आता देणाऱ्यांची संख्या ढिगाने वाढली आहे, पण चांगले घेणारे मात्र मिळत नाहीत. त्यात रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्ध आणि उत्तम कलाकृती यात गल्लत होऊ लागली आहे. सुमारांची सद्दी तर वाढतच आहे. तशी ती इथेही येईल.

कलेने परमानंद मिळावा असे म्हणतात. त्या आनंदात तरी निदान कोणती भेसळ असू नये, कला बघायची कला यायला हवी ती त्यासाठीच...

विनायक पाचलग 
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा