मंगळवार, ४ जून, २०१३

एकतरी मैफल अनुभवावी

गेल्या आठवड्यात ‘आयुष्यावर बोलू काही’ला जायचा योग आला. ‘व्हॅलेंटाइन डे’चा दिवस, सुंदर वातावरण यामुळं कार्यक्रमावेळी वातावरण ‘एकदम फ्रेश’ होतं. त्यात प्रेक्षकांमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं आगमन झालं आणि साऱ्या कार्यक्रमाचा रंगच पालटला. पंडितजी आल्याने सलील-संदीपकडून पेश होणाऱ्या नवनव्या कलाकृती, इतर व्यावसायिक कार्यक्रमांना असतात ती झुगारलेली वेळेची बंधने, सोबत आलेले मित्र यामुळे ही ‘मैफल’ वैयक्तिक जीवनात कायम संस्मरणात राहील, एवढं नक्की !

खरंतर, ‘आयुष्यावर बोलू काही’शी एक प्रेक्षक म्हणून माझं सहा वर्षांचं नातं आहे. असंख्य वेळा हा कार्यक्रम पाहिला आहे, पण तरीही कार्यक्रम आणि मैफल यात फरक असतो. कार्यक्रम असंख्य होतात. पण, मैफली मात्र फार कमी. शिवाय कार्यक्रम हा प्री-डिझाईन्ड असतो. मैफल मात्र आपसूक घडत जाते. म्हणूनच असेल कदाचित. पण वृत्तपत्रात आमंत्रण हे कार्यक्रमाचं येतं. मैफलीचं नाही. मैफल जमायला तो कार्यक्रम, कलाकार जगातला ‘द बेस्ट’च असायला लागतो असंही काही नाही. मनाच्या तारा जुळाव्या लागतात इतकचं!!!
एखादा कार्यक्रम आवडायला तो सर्वोत्तमच हवा असं काही नसतं. हाच निकष लावायचा झाला तर प्रत्येकाची प्रेयसी ‘ऐश्वर्या राय’ असायला हवी. नाही का?

असो, मुद्दा आहे मैफलींचा. मध्ये एकदा अचानक मला मी आतापर्यंत पाहिलेल्या, अनुभवलेल्या मैफली आठवल्या होत्या. त्यामध्ये बरेच प्रकार होते. एका साध्याशा ऑर्केस्ट्राने केलेल्या गाण्याचा कार्यक्रम होता. पूर्वी नवरात्रीत रात्री उशिरापर्यंत होणारे संगीताचे कार्यक्रम होते. मध्यंतरी खासबागेत तीन दिवस झालेले बाबासाहेब पुरंदरेंचे व्याख्यान होते. अगदी लहानपणी लाईट गेल्यावर जुन्या वाड्यात रंगलेली अंताक्षरी ते काही कळत नसताना दीड तास रंकाळ्यावर ऐकलेले पंडित भीमसेन जोशी असं बरंच काही होतं. या सगळ्या माझ्या आयुष्यातली अशा गोष्टी आहेत की, त्यांच्याबाबत कितीही बोललं, लिहिलं तरी परत परत त्याबाबत सांगावसं वाटत राहतं.

ही जी मैफलीची एकूणच प्रोसेस आहे, त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आजच्या जमान्यात जिथे दोन माणसांमध्ये संवाद अशक्य बनला आहे, तिथे शेकडोने माणसे एखाद्या गोष्टीशी एकरूप कशी होऊ शकतात? असे नक्की काय घडते की, समोरच्या कलाकृतीशी फक्त कान, डोळे नव्हे तर सारे शरीर आणि मन एकरूप होते? दरवेळचं केशवराव भोसले नाट्यगृह तेच, अगदी बऱ्याचदा माणसंही तीच. मग एखाद्याच वेळी असा ‘ऑरा’ का तयार होतो? लोक काही बाही सांगत असतात ब्रह्मानंदी टाळी लागते, दैवी असते वगैरे वगैरे. पण कलाकाराचा दररोज चालणारा रियाज या प्रोसेसमध्ये नक्की काय भूमिका बजावत असेल ? पेपर वाचतानाही कधी कधी मैफल जमल्याचा भास होतो. ते कसं? सर्वोत्कृष्ट अनुभवानंतरही मनात प्रश्न येत राहतात, ते असे...
आणि मग मला ‘मैफल’ ही समरसून जगण्याचे प्रतीक वाटू लागते. एकाच वेळी आपण म्हटलं तर एकटे असतो, आणि म्हटले तर एका मोठ्या समूहाचा भाग असतो. त्या कालावधीत जे सिंक्रोनायजेशन आपण पकडलेलं असतं, ते जणू आपल्या जगण्याच्या गतीला प्रतीत करतं. हे सगळं बरंच अबस्ट्रॅक्ट वाटेल, पण ज्याने एकसे एक मैफली अनुभवल्या आहेत, त्याला याचं महत्त्व पटलं असेल. कारण ‘मैफल’ ही अनुभवायची गोष्ट आहे. जसं लोक ‘एकतरी ओवी अनुभवावी’ म्हणतात, तसं मी ‘एकतरी मैफल अनुभवावी’ असं म्हणेन. आजकाल अशा मैफली होत नाहीत. झाल्याच तर मोबाइल असतोच मध्ये लुडबुडायला. बरं आजकाल बऱ्याचशा कार्यक्रमांना लोक मी याला पाहून आलो, त्याला ऐकून आलो असं इतरांना सांगायला येतात. पण या सगळ्यातून चुकून चान्स मिळाला, तर तो मात्र सोडू नका एवढीच इच्छा !

या मैफली मला बुस्टर डोस वाटतात. बाकी दररोजच्या पाट्या तर आपण नेहमीच टाकत असतो, पण अशी एखादी मैफल एनर्जी आणि फ्रेशनेस देऊन जाते ती मात्र बरेच दिवस टिकते. शिवाय कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी मनातल्या मनात ते प्रसंग आठवून आपण पुन्हा प्रत्ययाचा आनंदही घेऊ शकतो. नको त्या दृश्यासंगे वा नको त्या ठिकाणी नको त्या मैफली रंगविण्यापेक्षा या कलाकारांच्या मैफली जास्त चांगल्या, नाही का ?

प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी अनुभवलेली एखादी मैफल असेलच. ती जरी त्यांना आठवली तरी फार झाले.

विनायक पाचलग
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा