मंगळवार, ४ जून, २०१३

बदल... संस्कृती घडवणारा...

बदल हे दबक्या पावलानं येत असतात, असं म्हणतात. इंटरनेटच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू होतं. १० किंवा अगदी ५ वर्षांपूर्वीपर्यंत कोणी म्हटलं असतं की, भविष्यात तरुण फक्त कोणत्या न कोणत्या स्क्रीनला चिकटून राहून यप्स (येस), जी. एन., टी. सी. (गुड नाईट, टेक केअर) असे काहीतरी कायम बोलत राहतील, तर त्याला ऑलमोस्ट मूर्खातच काढलं गेलं असतं, पण हे घडलंय. आमच्याही नकळत आमच्या पिढीची भाषा, संदर्भ आणि इव्हन प्रेफरन्सेस बदललेत. त्यामुळे २१ व्या शतकातील संस्कृती घडविणारा घटक कोणता तर तो अर्थातच इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग.

इंटरनेटनं जग कसं जवळ आलं, गोष्टी कशा सोप्या झाल्या हे तुम्हा-आम्हा सगळ्यांना माहीत आहे आणि ते पुन्हा उगाळायची गरज नाही, पण या नव्या माध्यमाने आणखी काही बदल घडवलेत. जे मानसिकतेतील बदल आहेत. सर्वांत महत्त्वाचे बदल, पण त्याकडं आपलं म्हणावं तसं लक्ष गेलेलं नाही.
या माध्यमानं आमच्यावरचा जातीचा पगडा खूप कमी केलाय. अगदी परवा-परवापर्यंत मित्र-मैत्रिणी निवडताना ‘तो कोणत्या जातीतला आहे’ हे कळत-नकळत का होईना, पण मनात ताडलं जायचं. इथे इंटरनेटवर असला काही भाग मैत्रीच्या आड येत नाही. समान आवडी-निवडी, समान शिकवण या जोरावर इथे ओळख होते आणि संवादातून ती बहरते. बरेच जण तर पूर्ण नावसुद्धा ठेवत नाहीत सोशल नेटवर्किंग, चॅटवरती... पण त्याने देवाण-घेणावीत कधी अडथळा येत नाही. याचाच अर्थ असा की, जात-धर्म असे निकष आता आमच्यादृष्टीने दुय्यम प्रेफरन्सचे झालेत ही खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का?

फक्त जातच नव्हे, तर इतर कोणताच फोबिया आजकाल संवादाच्या आड येत नाही. वय, मान-मरातब, लिंग, प्रतिष्ठा काहीही नाही. जर का सोशल नेटवर्किंग नसतं, तर साठ वर्षांचा पुण्याचा माणूस आणि २० वर्षांचा कोल्हापुरी तरुण यांच्यात एखाद दुसरा अपवाद वगळता संवादाचे पूल बांधले गेले असते का? स्टेटस, पैसा यामुळे खऱ्या-खुऱ्या आयुष्यात ‘नॉट रिचेबल’ असलेली मंडळीसुद्धा इथे एका क्लिकवर उपलब्ध असतात. भल्या भल्या पत्रकारांच्या मांडणीची सामान्य पोरांनी ट्विटरवर केलेली चिरफाड हा तर वेगळाच अभ्यासण्याजोगा विषय. अर्थात, पूर्वीही असे ‘पत्रमित्र’ वगैरे होतेच. पण, त्या मानाने आज हे सगळं सोपं आणि रूटीनचा भाग झालंय हे महत्त्वाचं.

या माध्यमानं घडविलेली दुसरी मानसिकता म्हणते ‘आपणही व्यक्त होऊ शकतो’ हा कॉमन मॅनला दिलेला कॉन्फिडन्स. याआधी समाज, सत्ता, पैसा अशा विविध गोष्टींच्या भीतीमुळं बऱ्याच गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्या साऱ्यांना इथं प्लॅटफॉर्म मिळाला. कारण, या माध्यमात कोणी ज्येष्ठ नाही, सगळे समान. त्यातून मग अनेक गोष्टी बाहेर पडू लागल्या. ‘विकिलिक्स’ असो वा ‘कोब्रागेट’ ... ही सगळी त्याचीच परिणिती. व्हॉईस ऑफ अॅनॉनिमिटी अर्थात स्वतःची ओळख लपवता येणं हा पहिल्यांदाच प्लस पॉइंट म्हणून गणला गेला असेल. आपण सारेच समाजशील आहोत, त्यामुळे आपण काहीतरी बोलावं आणि लोकांनी ते ऐकावं अशी प्रत्येकाचीच सुप्त इच्छा असते. पूर्वी वर्तमानपत्रे, मासिके या साऱ्यासाठी अपुरी पडायची, पण इथे व्यक्त होण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज संपली. एक ब्लॉग काढला वा फेसबुकवर लिहिलं की झालं. त्यामुळं आम्हाला आता व्यक्त व्हायची सवय लागत चालली आहे. मग तो झालेला एखादा अन्याय असो वा एखादा अनुभव. तो शेअर होतोय. त्यामुळं राग, त्रास, आनंद अशा भावनांचा नीट निचरा होऊ शकतोय. इट्स गुड फॉर अस !!!

अर्थात, नवं माध्यम म्हटल्यावर समस्यासुद्धा असणारच. तशा त्या इथेही आहेत. आभासाला खरं मानणं, ड्युअल पर्सनॅलिटी सिंड्रोम, सेलिब्रिटींकडून रिप्लाय मिळावा म्हणून कसंही वागणं, आदी. पण हळूहळू या समस्यांवर उपाय निघत आहेत आणि या सगळ्या समस्यांचे मूळ आहे ते म्हणजे बदलाची गती. बाकी, सगळ्या माध्यमांना समाजाच्या क्रॉस-सेक्शनमध्ये पोहोचायला जो वेळ लागला त्याहून खूप लवकर हे माध्यम जगभर पोहोचलं. त्यामुळं, त्याचा अंदाजच आला नाही. आता मात्र ह्या माध्यमाबाबत आपण जास्त सजग आणि मॅच्युअर होत आहोत. त्यामुळंच एक गोष्ट नक्की वाटते की, येत्या काही वर्षांत आपल्या मनात, जनात, संस्कृतीत ये सोशल मीडिया अपनी गुल खिलाते रहेगा!!! लेट्स सी...

जाता जाता, फारसं कोणाच्या लक्षात आलं नाही, पण इंटरनेटवर जी पहिली ‘अधिकृत’ साईट ओपन झाली, तिला गेल्याच आठवड्यात २० वर्षे पूर्ण झाली आणि ‘लिंक्डइन’ या साईटला, जिने पहिल्यांदा जगात सोशल नेटवर्किंग म्हणजे काय ते रुजवलं, तिला १० वर्षे... या चर्चेलाही निमित्त तेच !!!

विनायक पाचलग
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा