मंगळवार, ४ जून, २०१३

अगदी नैमित्तिक....


तसा गेला आठवडा साहित्यिकच म्हणालया हवा. सुरुवात झाली ती २१ मार्चच्या जागतिक कविता दिनाने... हल्ली फेसबुकमुळे असे दिवस झटकन समजतात, पण समजला ते बरं झालं. ‘कविता’ तशी आपल्या सगळ्यांच्याच जवळची... प्रत्येकाने आयुष्यात एकदा का होईना ‘कवी’ बनायचा प्रयत्न केलेला असतो नाही का ? पण, कवितेला असे विशेष असे महत्त्व आपण देत नाही. ती नकळत कानावर पडते वा नजरेसमोर येते. जादू करते आणि नकळत निघून जाते. लोकं म्हणतात ते काही उगाच नाही की, कवितेसारखा दुसरा सहचारी नाही.

सुदैवाने सध्या मराठीत खूप छान कवी दिसत आहेत. मग ते ‘आनंदयात्री’ प्रसाद कुलकर्णी असोत, नवनव्या रचना मांडणारा वैभव जोशी असो... वाऱ्यावरच्या पसरणाऱ्या गंधासारखे तरल शब्द मांडणारा गुरू ठाकूर असो, आयुष्यावर चपखल बोलणारा संदीप खरे असो, नाहीतर थेट जगण्याशी भिडणारा किशोर कदम अर्थात सौमित्र असो. अर्थात, याहून ग्रेट वा यांच्यासारखेही बरेच आहेत. पण, ही नावे आम्हा लोकांमध्ये ट्रेडिंग आहेत. कधीकाळी मराठी कविता? असे प्रश्न विचारणारे आमचे बरेच मित्रवर्य आता जाता-जाता कट्ट्यावर दोन-चार ओळी झाडू लागले आहेत. बऱ्याच जणांच्या रिंगटोन मराठी झाल्यात. बाकी कोण चांगला, कोण वाईट या फंदात आपल्याला कशाला पडायचे आहे? कविता ऐकताना जो आत्मानंद मिळतो, तो वाढत चाललाय, एवढं पुरेसं आहे! २५ मार्च म्हणजे व. पु. काळेंचा जन्मदिवस... ज्या माणसानं एका पिढीला वाचायला शिकवलं तो माणूस... जर पु. ल. आणि व. पु. नसते तर आज मराठी वाचकच नसता असं काहीसं धाडसी विधान करावं वाटतं ते त्यासाठीच. म्हणजे, ज्यांची पुस्तकं हातात आल्यावर मी तरी त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडलो होतो. हातातली पुस्तकं सोडवत नव्हती. आजही नाहीत. गंमत म्हणजे, ही सगळी पुस्तकं ‘ऑलवेज रिडेबल’ प्रकारात मोडतात. म्हणजे कुठेही, कधीही आणि कितीदाही वाचा. नो प्रॉब्लेम अॅट ऑल!!!

म्हणूनच कदाचित व. पु. सुद्धा आजही ट्रेडिंग आहेत. त्यांच्या कोट्सचे फॉरवर्ड तर रोज फिरत असतात. एखाद्या वाक्याची छानशी कॅलिऑग्राफी बनवून रोज कोणी ना कोणी पोस्ट करत असतं. आजही सगळ्यांना ती ‘वपूर्झात’ली वाक्ये काही तरी सांगून जातात. व. पु. आवडतात ते त्यांनी ‘मध्यमवर्ग’ चितारला त्यासाठी. भारतात सगळ्यात जास्त असणारा हा वर्ग, पण फक्त या वर्गाच्या संवेदना मांडणारे लोक फार कमी. त्यात व. पुं.चा नंबर बराच वरचा. त्यांना कदाचित फारसे मोठे पुरस्कार मिळाले नसतीलही, पण सामान्य माणसाच्या मनात ते पोहोचले. प्रत्येक लोकप्रिय लिखाण ग्रेट नसते आणि ग्रेट लिखाण लोकप्रिय नसते, पण या दोन्हींचे मिश्रण असणारे लोक असतात. त्यात व.पु. येतात. सो, थँक यू व. पु.

आणि २६ मार्च म्हणजे कवी ग्रेस यांचा पहिला स्मृतिदिन... ज्या माणसाला समजून घ्यायचे अशी इच्छा आयुष्यभर बाळगावी इतका मोठा माणूस. मध्यंतरी त्यांचे ललितनिबंध वाचनात आले. नेहमीच्या पुस्तकासारखं नुसतं चाळावं म्हटलं आणि पहिल्याच ओळीला अडखळलो. शब्दाशब्दांतली ताकद जाणवू लागली. हळूहळू काही निबंध वाचून संपवले. सगळेच कळले अशातला भाग नाही, पण वाचक म्हणून अजून खूप पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव मात्र झाली. भाषा नक्की काय चीज आहे हे कळलं. आम्ही जी काही शिकलो ती भाषा म्हणजे काहीच नाही हे तेव्हाच कळून चुकलं.

त्या माणसाबाबत इतरांकडून खूप काही ऐकलेलं आणि वाचलेलं. आता तर त्यांच्यावर एक पुस्तकही निघालं आहे. बऱ्याच मान्यवरांनी लिहिलेल्या आठवणींचं. तेही विचायचं आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण, ग्रेस अनुभवायचा प्रयत्न केलेल्या प्रत्येकाला असाच काहीसा अनुभव आला असणार, एवढं नक्की.
तर, असे हे तीन दिवस... म्हटलं, तर एकदम साधे... कारण, इतर दिवसांसारखं याचं कुठं सेलिब्रेशन नव्हतं, असणारही नाही. अगदी

खरं सांगायचं तर मलाही ह्या सगळ्या गोष्टी फेसबुकमुळं कळाल्या. अर्थात, प्रत्येकाने मनात जरी ह्या गोष्टी जपल्या तरी खूप झालं.
जगण्याची धावपळ तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात चार चांगले क्षण देणाऱ्या लोकांना विसरायचा कोतेपणा आपल्या हातून होऊ नये, म्हणून हा खटाटोप!!!

विनायक पाचलग
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा