मंगळवार, ४ जून, २०१३

रिलेव्हन्स मॅटर्स

कधी कधी अचानक चांगल्या गोष्टी हाती लागतात. असेच परवा एक पुस्तक वाचायला मिळाले. ‘विक्रम वेताळच्या गोष्टी आणि तत्त्वे मॅनेजमेंटची.’ कधी ‘चांदोबा’त, तर कधी आणखी कुठे, अशा आपण वाचलेल्याच या गोष्टी. पण त्यामध्ये फक्त मनोरंजन सोडूनही बरंच काही आहे असं सांगणारं हे पुस्तक. अवघं १०० पानांचं असेल, पण आपला बघण्याचा अँगलच बदलून टाकणारं.

मागच्या आठवड्यात असंच एक नाटकही पाहायला मिळालं. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला...’ नाटकातला एक वेगळा प्रयोग म्हणून याला नक्कीच वाखाणायला हवं, पण त्यातून महत्त्वाचं आहे ते याचं विषयसूत्र. महाराजांच्या इतिहासापेक्षा त्यांच्या विचारधारेला फोकस करणारं हे नाटक. महाराज आजच्या पिढीत कसे उपयोगाचे हे सांगण्याचा बऱ्यापैकी प्रयत्नही त्यांनी केला आहे.

या दोन गोष्टींचा उल्लेख करण्यामागचं कारण एकच की, या दोन्ही कलाकृती इतिहासावर बेतलेल्या आहेत, पण इतिहासाची आजच्या काळाशी सांगड घालायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि हेच आज महत्त्वाचं आहे. नाहीतर एरवी इतिहासाबाबत बऱ्याच गोष्टी चालू असतात, पण त्याचा आज फायदा काय? असा विचार केला तर हाती फारसे काहीच लागत नाही. ‘इतिहासाचे पदस्थळ करून त्यावर तुमचे भविष्य रेखा’ अशी काहीशी म्हण शाळेत शिकल्याचे आठवते. पण भविष्य रचण्यापेक्षा भविष्य बिघडविण्यात, भावना भडकविण्यात आज इतिहास जास्त कामाला येत आहे.

म्हणजे अगदी आपल्या इतिहासाच्या पुस्तकाचेच बघा ना. मला तरी सनावळी आणि शहरांची नावेच जास्त पाठ केल्याची आठवतात. इतिहासातले विचारधन मात्र फार कमी मिळाले. हां अगदीच नव्हते असे काही नाही. बुद्धांचे वगैरे विचार होते, पण शालेय काळात एक तर ते डोक्यावरून जायचे आणि ते २१ व्या शतकात कसे वापरायचे ते तर कोणीच, कधीच सांगितले नाही. रामायण, महाभारताचेही तसेच. धार्मिक, सामाजिक कुंपणातूनच ते कायम समोर येतात, पण त्या पलीकडे जाऊन मानवी स्वभावाच्या त्या उत्तम डिक्शनऱ्या आहेत हे मात्र समोर यायचेच राहून जाते.

इतिहासाबाबत ज्ञान हवेच, याबाबत काहीच दुमत नाही. पण मुद्दा इतकाच की, आजचा जमाना एवढा फास्ट झाला आहे की, एवढे सारे वाचायला, समजून घ्यायला कोणालाच वेळ उरलेला नाही. शिवाय, आजची पिढी एवढी प्रॅक्टिकल आहे की, आजच्या लाइफमध्ये उपयोग असेल तरच ते एखादी गोष्ट करतात. मग अशावेळी जर का जुनाट पद्धतीने इतिहासाची मांडणी केली तर बरेच मोठे विचारधन आमच्या नजरेआड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता हेच बघा ना, विवेकानंदांचा सार्धशती महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी दररोज कार्यक्रम सुरू असतात. विवेकानंदांचे ते जगप्रसिद्ध भाषण जर रोज वाजवले जाते, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी मांडलेले विचार आम्हा पोरांना सांगितले तर जास्त चांगलं होणार नाही का? खरंतर आजच्या जगात ते विचार जास्त फायद्याचे आहेत. प्रत्येकजण उठवा की माझे आदर्श म्हणून विवेकानंदांचे नाव घेतो, पण त्यांच्याबद्दल चार वाक्ये सांगा म्हटलं की, मात्र बोबडी वळते.

मध्यंतरी एका व्याख्यानाला जायचा योग आला. वक्ता एकदम मोठा. मग विषय काय तर ‘गांधी आणि टागोर यांच्यामधला पत्रव्यवहार’. विषय चांगलाच आहे, नो डाउट, पण इथे मला तर का जगायचं? कसं? असा प्रश्न पडला असेल तर अशावेळी मी हे सगळं का आणि कशाला ऐकेन? राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे तर असंख्य लोक उठता, बसता येतात, पण आजच्या तरुणांना ते समजतील यासाठी किती प्रयत्न झाले किंवा केले जातात ?

अर्थात मुद्दा फक्त विषयाचाच नाही, तर भाषेचा आणि मांडणीचाही आहे. इतिहासातील भाषा आणि आजची भाषा यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आम्हाला आमचे महापुरूष आमच्या भाषेत समजावून हवे आहेत. तरच ते आम्हाला कळणार आहेत. जस्ट, गोष्टींकडे बघायचा अँगल बदलायचा अवकाश. काळाच्या भिंती मागे पडतात. विक्रम वेताळ, शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंट केस स्टडीज. लिडरशिप स्किल, सोशियो पॉलिटिकल करेक्टनेस यांची सांगड लागत जाते. आणि जग समजणे सोपे जाते. अर्थात, या हवेतल्या गप्पा नाहीत. बऱ्याच आयआयएम्सनी हे प्रूव्ह केलंय. आता आपण समजायची गरज आहे.

तासाभरापूर्वीची माहिती या क्षणाला शिळी असते. गती हाच या जगाचा मंत्र आहे आणि म्हणूनच ‘रिलेव्हन्स मॅटर्स’ हा खटाटोप ते समजण्यासाठी...


विनायक पाचलग 
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा