मंगळवार, ४ जून, २०१३

शॉर्ट अँड स्वीट... !!!

या युट्यूबचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. दरवेळी तो एखादी नवीच अलिबाबाची गुहा समोर आणतो, पण माझ्याबाबतीत बऱ्याचदा ती जाहिरातींची गुहा असते. कधीही कंटाळा आला की, जस्ट ‘अॅड्स’ म्हणून सर्च करायचं. प्रत्येकवेळी एक नवा अनुभव सामोर येतो. अवधी एका मिनिटाची गोष्ट, पण माहोल बदलणारी.

खरंतर ‘जाहिरात’ हा कलाप्रकार मला थोडा अंडररेटेड वाटतो. नकळत या जाहिराती आपल्या मनोभूमिका घडवत आल्या आहेत. पण आपण मात्र त्यांच्याकडं फार कमी वेळा सीरिअसली बघत आलो. ही काही आजकालची गोष्ट नाही, खूप जुनी आहे. म्हणजे ‘लिज्जत’ पापडच्या कव्हरवर पाडगावकरांची कविता यायची, तीही एक प्रकारची जाहिरातच. माझ्यापुरती तरी सुरुवात तिथूनच झाली म्हणायची. असाच एक बाप ‘जाहिरातवाला’ म्हणजे ब्रँड अमूल. एखाद्या वस्तूची जाहिरात समाजमनाचे प्रतिबिंब कसे बनते आणि त्यामुळे तो आपला ब्रँड कसा बनतो याचे हे उत्तम उदाहरण. ‘अमूल’ व त्यांच्या टॉप जाहिरातींचे चांगले ‘कॉफी टेबल बुक’ही काढले आहे. आजही वेगवेगळ्या भाषांतल्या अनेक वृत्तपत्रांत अमूलची ‘गर्ल’ दिमाखात झळकते.
अर्थात, ‘प्रिंट’चा जमाना तसा जुना झाला. व्हिज्युअल मीडियात तर अशा अनेक जाहिराती सांगता येतील. लहान असता ‘ओय बबली’ आणि ‘करलो दुनिया मुठ्ठी में...’ अशा दोन जाहिराती प्रचंड आवडल्याचे आठवते. त्यानंतरच्या काळात मग कॅडबरीच्या ‘शुभ आरंभ’, ‘कुछ मीठा हो जाए’ अशा सीरिज, कोकच्या ‘दो दिये और जलाओ’, ‘उम्मीदों वाली धून’ अशा सीरिज... अशी बरीच नावं सांगता येतील. अर्थात, या सगळ्यांची खास वैशिष्ट्ये म्हणजे त्याचं थीम साँग. सहज मनात बसणारं आणि काहीतरी मेसेज देणारं. याउलट ‘व्हॉट अॅन आयडिया’, ‘झुझू’, ‘फेव्हिकॉल’. ह्या जाहिराती थीममधली वैशिष्ट्ये दाखविणाऱ्या. ‘नेसकॅफे’ या सगळ्यांचं मिश्रण करते. दुसऱ्या बाजूला टाइम्स ग्रुपच्या ‘लीड इंडिया’सारख्या जाहिराती आजही मोबाइलमधून गाजणाऱ्या.

यातली एखादी कदाचित तुमचीही आवडती जाहिरात असेल, राइट? फक्त बऱ्याचदा आपण आपली आवडती जाहिरात शोधत बसत नाही. कुठं दिसली तर ठीक, नाहीतर नाही. पण, क्वचित चेंज म्हणून असा ‘जाहिरातीं’चा फ्लॅशबॅक घ्यायला काय हरकत आहे? मजा आयेगा, फॉर शुअर...!

असाच एक थोडासा वेगळा कलाप्रकार म्हणजे मालिकांची शीर्षकगीते. थँक्स टू मोबाइल की त्यामुळे आता ही चांगली गाणी पुन्हः पुन्हा ऐकायला मिळतात आणि त्यासाठी मालिकाही बघावी लागत नाही. मराठीत तर अशी कित्येक शीर्षकगीतं आहेत की, ज्यांनी इतिहास घडविला. ‘गोट्या’ ही साधारण आमची पिढी जन्मायच्या वेळची मालिका, पण तिचं गाणं आजही अधूनमधून ट्रेडिंग असतं. ‘मना घडवी संस्कार’ असंही एक शीर्षकगीत होतं. प्रार्थनाच वाटते ती. हिंदीत मालगुडी डेजचं असंच. आजही बऱ्याच जणांची रिंगटोन आहे ती.

खासगी चॅनेल्स आल्यावर तर अशी गाणी बरीच येत आहेत. मग ते कैशलचं ‘एक पॅकीट उम्मीद’ असो वा नीलेश मोहरीरची मराठी शीर्षकगीतं असो. ‘सारेगमपा’, ‘कुलवधू’ असे अनेक कार्यक्रम ज्यांची गाणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची होती. अर्थात ही लिस्ट प्रत्येकानुसार बदलत जाईल, पण जशा आपल्या मनाच्या कप्प्यात जाहिराती आहेत, तशी ही काही गाणीसुद्धा.

हे दोन्ही कलाप्रकार जास्त चॅलेंजिंग. कारण हातातला वेळ कमी आणि पोहोचवायचा संदेश मात्र जास्त. अवघ्या मिनिटभरात लोकांचं लक्ष वेधायचं आणि जे हवं आहे ते सांगायचं. इतर गोष्टींच्या भाऊगर्दीत आपलंच प्रॉडक्ट (मग ती वस्तू असो वा मालिका) लक्षात राहील याचाही प्रयत्न करायचा. शब्द, चाल, एक्स्प्रेशन सगळीकडे परफेक्शन हवंच. पण त्या मानानं हे सगळे घडवणारे चेहरे मात्र बऱ्याचदा पडद्याआडच राहतात. ना त्यांच्यासाठी कोणता बक्षीस समारंभ असतो, ना त्यांची विशेष ओळख करून दिली जाते. त्यामुळे नीलेश मोहरीर असो वा अॅडगुरू भरत दाभोळकर. हे फार कमी लोकांना माहीत असतात. बऱ्याचदा तर एखाद्या कन्सेप्टमागचा ब्रेन कोणाचा, हे शेवटपर्यंत समजतच नाही. जितकं रेकग्निशन चित्रपट वा इतर माध्यमांना मिळतं तेवढंच या दोन कलांनाही मिळायला हवं, असं मनापासून वाटत राहतं.

सध्या जमाना शॉर्ट गोष्टींचा आहे. शॉर्ट एसएमएस, शॉर्ट क्रिकेट, आदी. या सगळ्यात अशा दोन गोष्टी आहेत की, ज्या शॉर्ट आहेत, पण बऱ्याच मोठा परिणाम करणाऱ्या आहेत. आपल्या कामाच्या धबडग्यात त्यांची दखल घेणं राहून जाऊ नये एवढंच.


विनायक पाचलग 
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा