मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

प्रेम, रिलेशनशिप इ. इ.

लेखाचे नाव वाचूनच तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, आज अचानक गाडी प्रेमाबिमाकडे कशी काय घसरली ? त्याचं असं आहे की, आज आधीच १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’. मग प्रेमासारख्या गोष्टीवर आजच्या दिवशी तर बोललंच पाहिजे आणि आपली संस्कृती म्हणजे तरी काय हो, प्रेमासारख्या वेगवेगळ्या भावभावनांचा आणि संवेदनांचा समुच्चयच नाही का? त्यामुळंच असेल कदाचित, पण अनादिकाळापासून ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ म्हणत प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून, मग ती चित्रकला असो वा कविता, या प्रेमाचा शोध घेत आलेला आहे आणि आजही तो शोध अखंडपणे सुरू आहे. आजच्या वृत्तपत्रांत, नेटवर जरी नजर फिरवलीत तरी तुम्हाला त्याची प्रचिती येऊन जाईल.
असो, पण आजचा प्रश्न असा आहे की, बदलत्या काळाप्रमाणे प्रेम बदललं, त्याची रिलेशनशिप झाली, पण आपली संस्कृती आणि समाज कुणाकडे पाहतो. वेगवेगळ्या प्रेमिकांच्या जोड्या आणि त्यांच्या कथा आपण आदराने सांगतो. मात्र, दुसऱ्या बाजूला कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरातही आजही ‘प्रेमविवाह’ म्हटले की नाकं मुरडली जातातच. हा विरोधाभास का? जात, धर्म, रंग यांच्या जळमटात आपण अजूनही गुरफटलेले आहोत का ? अर्थात, समाजमन असं रात्रीतून कधीच बदलत नसतं, पण ज्या गतीनं आमची पिढी बदलती आहे, तो वेग पाहिला तर आता सारा समाज मॅच्युअर व्हायची गरज आहे. नाहीतर, ही जनरेशन गॅप वाढतच जाईल, एवढं नक्की!!!
निमशहरी भागात अजूनही प्रकर्षानं येणारा अनुभव म्हणजे, एक मुलगा आणि एक मुलगा एकत्र दिसले की, त्यांच्याविषयी लगेच गॉसिपिंग सुरू. तरुणांविषयी अतिकाळजी वाटणाऱ्या काका, मामा, काकू, ताईंचे घरी फोन आणि उपदेशाचे डोस लगेच सुरू. बऱ्याच जणांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण हीच खरी ग्राउंड रिअॅलिटी आहे, हे मात्र खरं!
आज जमाना एवढा बदललेला आहे की, तरुण-तरुणीने एकत्र काम करणे ही काळाची गरज आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात तर आहेच आहे. मग प्रोजेक्टसाठी वगैरे एकत्र फिरणे ओघाने आलेच. पोरं मॅच्युअर आहेत. गरज आहे ती समाजाच्या नजरा आणि नजरिया बदलण्याची.
मला इथे आम्ही शहाणे आणि ज्येष्ठांची पिढी बाद असं अजिबात म्हणायचं नाहीए. हे सगळं बोलायचं कारण इतकंच की, आजची पिढी प्री-मॅच्युअर्ड आहे. बऱ्याच गोष्टी आम्हाला बऱ्याच कारणांमुळे विशेषतः टेक्नॉलॉजीमुळे खूप लवकर कळू लागल्या आहेत. आजकाल आठवी-नववीची मुलं रिलेशनशिपमध्ये असतात. शाळेतच त्यांचे सो कॉल्ड ब्रेकअप आणि पॅचअप होतात. बऱ्याच जणांना अॅट्रॅक्शन म्हणजे प्रेम असं वाटतं आणि एक दिवस मग फेसबुकवर ‘इन अ रिलेशनशिप विथ....’ म्हणून अपडेट केलं जातं. कॉलेजच्या परिसरात होणाऱ्या मारामाऱ्या, भांडणे पहा. त्यातली जवळपास ८० टक्के भांडणे आपल्या तथाकथित प्रेमिकेवर हक्क सांगणे यावरून झालेली असतात. मला आठवतं, मध्यंतरी कोल्हापुरातच एका कार्यक्रमात उज्ज्वल निकम यांनी एक धोक्याचा इशारा दिला होता की, आडनिड्या वयात प्रेमिकेवर हक्क सांगायला लागणे, हीच दहशतवादाची खरी सुरुवात असते. अशा वेळी, फक्त पोरांना नावं ठेवून, टेक्नॉलॉजीला नाव ठेवून काही होणार नाही. गरज आहे ती तरुण पिढीशी आमच्या भाषेत बोलण्याची. मनाची कोरी पाटी ठेवून. नव्या संदर्भानुसार आपली संस्कृती मॉडिफाय करण्याची.
आजकालच्या दिवसात ‘व्हॅलेंटाइन डे’ असावा की नसावा? अशीही एक चर्चा जोरात असते. मला तरी तो निव्वळ बाष्कळपणा वाटतो. कोणी चर्चा केल्याने हे सेलिब्रेशन थांबवणाऱ्यातले आम्ही लोक नाही. ज्यांना सेलिब्रेट करायचं ते हा दिवस सेलिब्रेट करणारच आणि त्याने ‘भारतीय संस्कृती’ला धक्का वगैरे बसतो, असेही मला वाटत नाही. प्रेमाचा वगैरे असा एखादा दिवस नसतोच. प्रेम ही चिरकाल टिकणारी भावना आहे हे आम्हालाही माहीत आहे. फक्त आजकाल जो ‘सेलिब्रेशन फिव्हर’ आला आहे त्याचा हा परिणाम आहे. मार्केट इकॉनॉमीनं तयार केलेलं एक नवं प्रॉडक्ट... जे फक्त या दिवशी स्वतःच्या प्रेमाचं शो ऑफ करतात, त्यांची व्हॅलेंटाइन दरवर्षी वेगळी असते. सो, ज्यांचा विचार करायची गरज नाही आणि जे खरोखरच प्रेमिक आहेत, त्यांना या धावपळीच्या जगात एकमेकांना द्यायला हक्काचा वेळ आणि दिवस मिळतो, सो इट्स गुड ना !!!
थोडं विषयांतर होईल, पण आजच्या दिवशी काही लोकांची दखल घेणे समायोचित ठरेल. असं म्हणतात की, कलाकृती आणि विशेषतः सिनेमे समाजमन घडवतात आणि ते खरंही आहे. गेली कित्येक वर्षे नायक-नायिका आधी ‘नकार’, मग तरुणाकडून तिला त्रास देणे, मग प्रेम, मारामारी, व्हिलन, प्रेमाचा त्रिकोण अशा साचेबद्ध गोष्टीत सिनेमा अडकला होता आणि तशाच इमेजेस आपल्याही मनात होत्या. पण ‘मुंबई-पुणे-मुंबई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ असे दोन नितांतसुंदर सिनेमे देणारा मराठीतला सतीश राजवाडे, ‘जब वी मेट’, ‘लव्ह आजकल’वाला इम्तियाज अली, ‘वेकअप सिद’वाला अयान मुखर्जी अशा तरुण लोकांनी या इमेजेसना तडा देण्याचे काम आपापल्यापरीने अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेले आहे. कोणताही गाजावाजा न करता ते कॉमन मॅनची, खरीखुरी, आपली वाटणारी प्रेमाची गोष्ट दाखवत आहेत. त्यामुळे समाजमन मॅच्युअर व्हायला नक्कीच मदत होतीय. सो, आजच्या दिवशी हॅट्स ऑफ टू सेम!
बोलण्यासारखं बरंच आहे, पण आजचा दिवस रूक्ष बोलण्यासाठी नाही. सो, प्रत्येकाच्या प्रेमाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो, या सदिच्छेसह... हॅपी व्हॅलेंटाइन डे... !!!
विनायक पाचलग

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा