बुधवार, २४ एप्रिल, २०१३

व्हॉट कॅन आय डू?

एखादी चांगली वा वाईट गोष्ट घडल्यावर एखादा समाज, एखादे शहर कसे रिअॅक्ट होते, यावर त्या शहराची संस्कृती ठरते असं म्हणतात. कोल्हापूरकरांचा खरंच त्याबाबतीत नाद करायचा नाही. प्रेम करावं एखाद्यावर तर ते कोल्हापूरनंच. हे सगळं आठवायचं काण एवढंच की, गेल्या आठवड्यात-दोन आठवड्यांत घडलेल्या घटना. राही सरनोबत, उषा जाधव, न्यूयॉर्कच्या कौन्सुल जनरलपदी नियुक्ती झालेले ज्ञानेश्वर मुळे या सर्वांनी कोल्हापूरची मान उंचावली, पण महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरकरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. सत्कार, शुभेच्छांचा अगदी वर्षाव केला. परवाच झालेला मुळे यांचा नागरी सत्कार सोहळा हा तर त्यावरचा कळसच....
हा सत्कार सोहळा बऱ्याच अर्थांनी वेगळा होता. पारंपरिक रूढींना फाटा देणारा... ‘एका यशस्वी माणसाच्या मागे हजारो यशस्वी माणसे असतात’ या चिनी म्हणीची जाणीव करून देऊन पडद्यामागच्या माणसांचा सत्कार इथे झाला. पण सर्वांत महत्त्वाचा वाटला तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडलेला विचार. ज्ञानेश्वर मुळेंनी विचारलं की, ‘व्हॉट कॅन आय डू फॉर कोल्हापूर?’ ‘ते सांगा, त्यानुसार काम करायचा प्रयत्न करीन.’ एखादा अधिकारी स्वतःहून विचारतो की, मी काय करू ते सांगा. समथिंग डिफरंट. आणि तिथे अजून एक प्रश्न डोक्यात आला की, आपण असा विचार कधी का करत नाही?
म्हणजे, फक्त मोठ्या माणसांनीच आपल्या गावचा विचार करावा असं थोडीच आहे. तुमच्या माझ्यासारख्या कॉमन मॅननेसुद्धा तो केला तर? आपण, आपल्या करिअरचा, आपल्या प्रगतीचा विचार करत राहतो, पण त्याचवेळी आपण कोल्हापूरसाठी काय केलं, आपल्या गावासाठी काय केलं याचा विचार आपण बऱ्याचदा विसरतो. उतारवयातच आपलं गाव आठवावं असा काही मानक नाही. उलट आत्ताच, जोवर जमतंय तोवर आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करायला जमू शकेल आणि प्रत्येकाने फार मोठं काही काम करावं असं कधीच नसतं. जाता-जाता केली जाणारी एखादी कृती आपल्या शहराच्या इमेजला निदान बाधा आणत नाही. एवढे तरी पाहता येईल. नाही का?
काम राहू दे, पण मी माझ्या कोल्हापूरसाठी काहीतरी देणं लागतो ही फिलिंग महत्त्वाची आहे. ‘त्या’ साध्या प्रश्नांनी ती जाणीव झाली. बऱ्याचदा आपण ‘माझं कोल्हापूर’ म्हणून ठिकठिकाणी मिरवत राहतो. पण, ते घडविण्यात माझा पर्सनल काही वाटा आहे का? हे तपासायला मात्र विसरतो.
एखादं गाव तिथल्या माणसांमुळं घडतं असं म्हणतात. त्यामुळं आपलं कोल्हापूर आपणच घडवायला पाहिजे. दुसरे कोणी येऊन ते करून देईल, अशी वाट पाहण्यात पॉइंट नाही. करण्यासारखे म्हणाल तर बरेच आहे. कोल्हापूरला नवी ओळख मिळवून देण्याची वेळ आलेली आहे. गूळ, चप्पल, तांबडा-पांढरा हे तर आहेच, पण ब्रँडिंगच्या या जगात त्यांना नवा साज द्यावा लागणार आहे. आता गावातली लोकं आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचत आहेत. आता अख्ख्या कोल्हापूरला त्या पातळीवर पोहोचवायची गरज आहे. थोडक्यात, त्याच कार्यक्रमात नाबार्डचे माजी चेअरमन यशवंतराव थोरात म्हणाले, ‘तसं इथून एक नव्हे तर हजार ज्ञानेश्वर मुळे, राही सरनोबत तयार व्हायची गरज आहे. त्यासाठी तुम्ही, मी, आपण प्रयत्न करायला हवेत. थोडंस वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर, जसं जगात धावपटू म्हटलं की केनिया आठवतो, फुटबॉल म्हटलं की ब्राझील आठवतो, कलात्मक सिनेमा म्हटलं की इराण आठवतो. तसं एखाद्या गोष्टीबाबत कोल्हापूरचं नाव जोडलं गेलं पाहिजे. खरोखर जगात भारी काही हवं असेल त्या ‘क्ष’ फिल्डमधलं, तर ते इथं मिळणार ‘ब्रँड कोल्हापूर’ मोठा झाला पाहिजे. त्यासाठी कामाचं सातत्य हवं. मधल्या काळात ‘फिल्म फेस्टिव्हल’ म्हणजे कोल्हापूर असं समीकरण तयार होऊ पाहात होतं, पण आताच सुरू असणाऱ्या मराठी-हिंदी फिल्म फेस्टिव्हलला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नाही. एक व्रत म्हणून आपण अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावली पाहिजे.
बाकी ‘मी एकटा काय करणार?’ हा प्रश्न तर पडेलच, पण सुरुवात एकट्यानेच होते. पांडुरंग तावरे नावाच्या एका माणसानं कृषी पर्यटन सुरू केलं. आता तो मोठा व्यवसाय आणि नवी ओळख झाली आहे. म्हणजे ‘कुछ तो हो सकता है! !!!’ अर्थात, तुम्हाला मला उपदेशांचा डोस ऐकायला आवडत नाही. त्यामुळे, हा उपदेश नाही, पण त्या भाषणानंतर पडलेल्या प्रश्नांचा आणि स्वप्नांचाही धांडोळा आहे. त्या साऱ्यातून काहीतरी घडावं ही इच्छादेखील.
अवधूत गुप्तेंची ‘माझं कोल्हापूर’ कविता म्हणताना मनात अभिमानाबरोबर समाधानही यावं, यासाठी...


Maharashtra Times
18 april 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा