मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

प्रेम, रिलेशनशिप इ. इ.

लेखाचे नाव वाचूनच तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, आज अचानक गाडी प्रेमाबिमाकडे कशी काय घसरली ? त्याचं असं आहे की, आज आधीच १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’. मग प्रेमासारख्या गोष्टीवर आजच्या दिवशी तर बोललंच पाहिजे आणि आपली संस्कृती म्हणजे तरी काय हो, प्रेमासारख्या वेगवेगळ्या भावभावनांचा आणि संवेदनांचा समुच्चयच नाही का? त्यामुळंच असेल कदाचित, पण अनादिकाळापासून ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ म्हणत प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून, मग ती चित्रकला असो वा कविता, या प्रेमाचा शोध घेत आलेला आहे आणि आजही तो शोध अखंडपणे सुरू आहे. आजच्या वृत्तपत्रांत, नेटवर जरी नजर फिरवलीत तरी तुम्हाला त्याची प्रचिती येऊन जाईल.
असो, पण आजचा प्रश्न असा आहे की, बदलत्या काळाप्रमाणे प्रेम बदललं, त्याची रिलेशनशिप झाली, पण आपली संस्कृती आणि समाज कुणाकडे पाहतो. वेगवेगळ्या प्रेमिकांच्या जोड्या आणि त्यांच्या कथा आपण आदराने सांगतो. मात्र, दुसऱ्या बाजूला कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरातही आजही ‘प्रेमविवाह’ म्हटले की नाकं मुरडली जातातच. हा विरोधाभास का? जात, धर्म, रंग यांच्या जळमटात आपण अजूनही गुरफटलेले आहोत का ? अर्थात, समाजमन असं रात्रीतून कधीच बदलत नसतं, पण ज्या गतीनं आमची पिढी बदलती आहे, तो वेग पाहिला तर आता सारा समाज मॅच्युअर व्हायची गरज आहे. नाहीतर, ही जनरेशन गॅप वाढतच जाईल, एवढं नक्की!!!
निमशहरी भागात अजूनही प्रकर्षानं येणारा अनुभव म्हणजे, एक मुलगा आणि एक मुलगा एकत्र दिसले की, त्यांच्याविषयी लगेच गॉसिपिंग सुरू. तरुणांविषयी अतिकाळजी वाटणाऱ्या काका, मामा, काकू, ताईंचे घरी फोन आणि उपदेशाचे डोस लगेच सुरू. बऱ्याच जणांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण हीच खरी ग्राउंड रिअॅलिटी आहे, हे मात्र खरं!
आज जमाना एवढा बदललेला आहे की, तरुण-तरुणीने एकत्र काम करणे ही काळाची गरज आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात तर आहेच आहे. मग प्रोजेक्टसाठी वगैरे एकत्र फिरणे ओघाने आलेच. पोरं मॅच्युअर आहेत. गरज आहे ती समाजाच्या नजरा आणि नजरिया बदलण्याची.
मला इथे आम्ही शहाणे आणि ज्येष्ठांची पिढी बाद असं अजिबात म्हणायचं नाहीए. हे सगळं बोलायचं कारण इतकंच की, आजची पिढी प्री-मॅच्युअर्ड आहे. बऱ्याच गोष्टी आम्हाला बऱ्याच कारणांमुळे विशेषतः टेक्नॉलॉजीमुळे खूप लवकर कळू लागल्या आहेत. आजकाल आठवी-नववीची मुलं रिलेशनशिपमध्ये असतात. शाळेतच त्यांचे सो कॉल्ड ब्रेकअप आणि पॅचअप होतात. बऱ्याच जणांना अॅट्रॅक्शन म्हणजे प्रेम असं वाटतं आणि एक दिवस मग फेसबुकवर ‘इन अ रिलेशनशिप विथ....’ म्हणून अपडेट केलं जातं. कॉलेजच्या परिसरात होणाऱ्या मारामाऱ्या, भांडणे पहा. त्यातली जवळपास ८० टक्के भांडणे आपल्या तथाकथित प्रेमिकेवर हक्क सांगणे यावरून झालेली असतात. मला आठवतं, मध्यंतरी कोल्हापुरातच एका कार्यक्रमात उज्ज्वल निकम यांनी एक धोक्याचा इशारा दिला होता की, आडनिड्या वयात प्रेमिकेवर हक्क सांगायला लागणे, हीच दहशतवादाची खरी सुरुवात असते. अशा वेळी, फक्त पोरांना नावं ठेवून, टेक्नॉलॉजीला नाव ठेवून काही होणार नाही. गरज आहे ती तरुण पिढीशी आमच्या भाषेत बोलण्याची. मनाची कोरी पाटी ठेवून. नव्या संदर्भानुसार आपली संस्कृती मॉडिफाय करण्याची.
आजकालच्या दिवसात ‘व्हॅलेंटाइन डे’ असावा की नसावा? अशीही एक चर्चा जोरात असते. मला तरी तो निव्वळ बाष्कळपणा वाटतो. कोणी चर्चा केल्याने हे सेलिब्रेशन थांबवणाऱ्यातले आम्ही लोक नाही. ज्यांना सेलिब्रेट करायचं ते हा दिवस सेलिब्रेट करणारच आणि त्याने ‘भारतीय संस्कृती’ला धक्का वगैरे बसतो, असेही मला वाटत नाही. प्रेमाचा वगैरे असा एखादा दिवस नसतोच. प्रेम ही चिरकाल टिकणारी भावना आहे हे आम्हालाही माहीत आहे. फक्त आजकाल जो ‘सेलिब्रेशन फिव्हर’ आला आहे त्याचा हा परिणाम आहे. मार्केट इकॉनॉमीनं तयार केलेलं एक नवं प्रॉडक्ट... जे फक्त या दिवशी स्वतःच्या प्रेमाचं शो ऑफ करतात, त्यांची व्हॅलेंटाइन दरवर्षी वेगळी असते. सो, ज्यांचा विचार करायची गरज नाही आणि जे खरोखरच प्रेमिक आहेत, त्यांना या धावपळीच्या जगात एकमेकांना द्यायला हक्काचा वेळ आणि दिवस मिळतो, सो इट्स गुड ना !!!
थोडं विषयांतर होईल, पण आजच्या दिवशी काही लोकांची दखल घेणे समायोचित ठरेल. असं म्हणतात की, कलाकृती आणि विशेषतः सिनेमे समाजमन घडवतात आणि ते खरंही आहे. गेली कित्येक वर्षे नायक-नायिका आधी ‘नकार’, मग तरुणाकडून तिला त्रास देणे, मग प्रेम, मारामारी, व्हिलन, प्रेमाचा त्रिकोण अशा साचेबद्ध गोष्टीत सिनेमा अडकला होता आणि तशाच इमेजेस आपल्याही मनात होत्या. पण ‘मुंबई-पुणे-मुंबई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ असे दोन नितांतसुंदर सिनेमे देणारा मराठीतला सतीश राजवाडे, ‘जब वी मेट’, ‘लव्ह आजकल’वाला इम्तियाज अली, ‘वेकअप सिद’वाला अयान मुखर्जी अशा तरुण लोकांनी या इमेजेसना तडा देण्याचे काम आपापल्यापरीने अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेले आहे. कोणताही गाजावाजा न करता ते कॉमन मॅनची, खरीखुरी, आपली वाटणारी प्रेमाची गोष्ट दाखवत आहेत. त्यामुळे समाजमन मॅच्युअर व्हायला नक्कीच मदत होतीय. सो, आजच्या दिवशी हॅट्स ऑफ टू सेम!
बोलण्यासारखं बरंच आहे, पण आजचा दिवस रूक्ष बोलण्यासाठी नाही. सो, प्रत्येकाच्या प्रेमाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो, या सदिच्छेसह... हॅपी व्हॅलेंटाइन डे... !!!
विनायक पाचलग
बुधवार, २४ एप्रिल, २०१३

व्हॉट कॅन आय डू?

एखादी चांगली वा वाईट गोष्ट घडल्यावर एखादा समाज, एखादे शहर कसे रिअॅक्ट होते, यावर त्या शहराची संस्कृती ठरते असं म्हणतात. कोल्हापूरकरांचा खरंच त्याबाबतीत नाद करायचा नाही. प्रेम करावं एखाद्यावर तर ते कोल्हापूरनंच. हे सगळं आठवायचं काण एवढंच की, गेल्या आठवड्यात-दोन आठवड्यांत घडलेल्या घटना. राही सरनोबत, उषा जाधव, न्यूयॉर्कच्या कौन्सुल जनरलपदी नियुक्ती झालेले ज्ञानेश्वर मुळे या सर्वांनी कोल्हापूरची मान उंचावली, पण महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरकरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. सत्कार, शुभेच्छांचा अगदी वर्षाव केला. परवाच झालेला मुळे यांचा नागरी सत्कार सोहळा हा तर त्यावरचा कळसच....
हा सत्कार सोहळा बऱ्याच अर्थांनी वेगळा होता. पारंपरिक रूढींना फाटा देणारा... ‘एका यशस्वी माणसाच्या मागे हजारो यशस्वी माणसे असतात’ या चिनी म्हणीची जाणीव करून देऊन पडद्यामागच्या माणसांचा सत्कार इथे झाला. पण सर्वांत महत्त्वाचा वाटला तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडलेला विचार. ज्ञानेश्वर मुळेंनी विचारलं की, ‘व्हॉट कॅन आय डू फॉर कोल्हापूर?’ ‘ते सांगा, त्यानुसार काम करायचा प्रयत्न करीन.’ एखादा अधिकारी स्वतःहून विचारतो की, मी काय करू ते सांगा. समथिंग डिफरंट. आणि तिथे अजून एक प्रश्न डोक्यात आला की, आपण असा विचार कधी का करत नाही?
म्हणजे, फक्त मोठ्या माणसांनीच आपल्या गावचा विचार करावा असं थोडीच आहे. तुमच्या माझ्यासारख्या कॉमन मॅननेसुद्धा तो केला तर? आपण, आपल्या करिअरचा, आपल्या प्रगतीचा विचार करत राहतो, पण त्याचवेळी आपण कोल्हापूरसाठी काय केलं, आपल्या गावासाठी काय केलं याचा विचार आपण बऱ्याचदा विसरतो. उतारवयातच आपलं गाव आठवावं असा काही मानक नाही. उलट आत्ताच, जोवर जमतंय तोवर आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करायला जमू शकेल आणि प्रत्येकाने फार मोठं काही काम करावं असं कधीच नसतं. जाता-जाता केली जाणारी एखादी कृती आपल्या शहराच्या इमेजला निदान बाधा आणत नाही. एवढे तरी पाहता येईल. नाही का?
काम राहू दे, पण मी माझ्या कोल्हापूरसाठी काहीतरी देणं लागतो ही फिलिंग महत्त्वाची आहे. ‘त्या’ साध्या प्रश्नांनी ती जाणीव झाली. बऱ्याचदा आपण ‘माझं कोल्हापूर’ म्हणून ठिकठिकाणी मिरवत राहतो. पण, ते घडविण्यात माझा पर्सनल काही वाटा आहे का? हे तपासायला मात्र विसरतो.
एखादं गाव तिथल्या माणसांमुळं घडतं असं म्हणतात. त्यामुळं आपलं कोल्हापूर आपणच घडवायला पाहिजे. दुसरे कोणी येऊन ते करून देईल, अशी वाट पाहण्यात पॉइंट नाही. करण्यासारखे म्हणाल तर बरेच आहे. कोल्हापूरला नवी ओळख मिळवून देण्याची वेळ आलेली आहे. गूळ, चप्पल, तांबडा-पांढरा हे तर आहेच, पण ब्रँडिंगच्या या जगात त्यांना नवा साज द्यावा लागणार आहे. आता गावातली लोकं आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचत आहेत. आता अख्ख्या कोल्हापूरला त्या पातळीवर पोहोचवायची गरज आहे. थोडक्यात, त्याच कार्यक्रमात नाबार्डचे माजी चेअरमन यशवंतराव थोरात म्हणाले, ‘तसं इथून एक नव्हे तर हजार ज्ञानेश्वर मुळे, राही सरनोबत तयार व्हायची गरज आहे. त्यासाठी तुम्ही, मी, आपण प्रयत्न करायला हवेत. थोडंस वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर, जसं जगात धावपटू म्हटलं की केनिया आठवतो, फुटबॉल म्हटलं की ब्राझील आठवतो, कलात्मक सिनेमा म्हटलं की इराण आठवतो. तसं एखाद्या गोष्टीबाबत कोल्हापूरचं नाव जोडलं गेलं पाहिजे. खरोखर जगात भारी काही हवं असेल त्या ‘क्ष’ फिल्डमधलं, तर ते इथं मिळणार ‘ब्रँड कोल्हापूर’ मोठा झाला पाहिजे. त्यासाठी कामाचं सातत्य हवं. मधल्या काळात ‘फिल्म फेस्टिव्हल’ म्हणजे कोल्हापूर असं समीकरण तयार होऊ पाहात होतं, पण आताच सुरू असणाऱ्या मराठी-हिंदी फिल्म फेस्टिव्हलला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नाही. एक व्रत म्हणून आपण अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावली पाहिजे.
बाकी ‘मी एकटा काय करणार?’ हा प्रश्न तर पडेलच, पण सुरुवात एकट्यानेच होते. पांडुरंग तावरे नावाच्या एका माणसानं कृषी पर्यटन सुरू केलं. आता तो मोठा व्यवसाय आणि नवी ओळख झाली आहे. म्हणजे ‘कुछ तो हो सकता है! !!!’ अर्थात, तुम्हाला मला उपदेशांचा डोस ऐकायला आवडत नाही. त्यामुळे, हा उपदेश नाही, पण त्या भाषणानंतर पडलेल्या प्रश्नांचा आणि स्वप्नांचाही धांडोळा आहे. त्या साऱ्यातून काहीतरी घडावं ही इच्छादेखील.
अवधूत गुप्तेंची ‘माझं कोल्हापूर’ कविता म्हणताना मनात अभिमानाबरोबर समाधानही यावं, यासाठी...


Maharashtra Times
18 april 

थोडं इकडेही लक्ष देऊया..

यावर्षी महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत साठी लिहित आहे ... त्यातलेच काही लेख .. कॉपी पेस्ट


बऱ्याचदा आपल्या मनात काही प्रतिमा , संकल्पना तयार झालेल्या असतात. म्हणजे , ' साहित्य म्हणजे काय ', ' संस्कृती ' म्हणजे काय , ' सांस्कृतिक चळवळ ', ' कार्यकर्ता ' म्हणजे काय वगैरे...वगैरे. पण , कधीकधी अगदी अनाहूतपणे काही चांगल्या , नव्या गोष्टी नजरेसमोर येतात. आणि , आपल्या कालानुरूप तयार झालेल्या संकल्पनांना धक्का लावून जातात. बऱ्याच वर्षात तयार झालेले समज खोटे ठरवतात. फक्त , अशा गोष्टी अनुभवायला आणि ओळखायला येणं महत्त्वाचं...

आपली कला दाखवायला फक्त कॅनव्हासच लागतो हा समज भेदणारा एक माणूस फेसबूकवर भेटला. बी. जी. लिमये. पेशाने नोकरदार... तसा कलेशी फार जवळचा वगैरे संबंध होता अशातला भाग नाही. पण , कॅलिओग्राफीची आवड आहे. ही व्यक्ती काय करते ? दररोज एका कवितेची कॅलिओग्राफी ते करतात आणि फेसबुकच्या आपल्या वॉलवर प्रकाशित करतात. आता त्यांच्या या कॅलिओग्राफी इतक्या प्रसिद्ध झाल्या आहेत , की त्यांनी एखादी इमेज टाकायचा अवकाश... थोड्याच वेळात.. त्या इ-मेल फॉरवर्डस् मधून फिरू लागलेल्या असतात. बरं , कॅलिओग्राफीही अगदी प्रसंगानुरूप असते. त्या -त्या दिवसाचे महत्त्व ओळखून केलेली. शिवाय , चित्राच्या सोबतीला त्या कवितेचे छानसे विवेचनही. त्यात , त्यांचे वाचनही दांडगे. कधी एखादा फारसा माहित नसलेला अनवट कवी आणि कविता भेटते , तर कधी एखाद्या फेमस कवीची माहित नसणारी कविता. उत्तम रंगसंगती... अर्थात , दररोज मिळणारी एक ऑनलाइन मेजवानीच.

डॉ. श्रीनिवास देशपांडे... पेशाने डॉक्टर... रूग्णांना तपासणे , बरे करणे हे त्यांचे रोजचे काम. पण यात मिळणाऱ्या अनुभवांमुळे असेल , वा जगाकडे बघायच्या सापेक्ष नजरेने असेल. ते कायमच फेसबुकवर वेगवेगळ्या ' नोटस् ' लिहितात... साधारण सकाळीसकाळी ती अपडेट होते बऱ्याचदा. खूप साऱ्या जगण्याची एक पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या... ते लिखाण वाचून तुमच्या दिवसाची चांगली सुरूवात करणाऱ्या. वा कधीतरी आलेला एखादा अविस्मरणीय अनुभव मांडलेला तर बऱ्याचदा जगण्यातल्या एखाद्या विसंगतीवर मार्मिकपणे बोट ठेवलेले. अर्थात , या लिखाणाला कोणत्या फॉर्ममध्ये बसवायचे ठरवणे हे अवघड. आणि चांगल्या गोष्टींना फॉर्मची गरजच काय असते म्हणा ? स्वतःच्या गडबडीच्या डॉक्टरी जीवनातून स्वतःला आणि इतरांना आनंद देण्याचा हा प्रयत्न...सोफ्यावर बसून वा जेवण झाल्यावर कट्ट्यावर ' आत्ता जगाचे कसे होणार ?' ' पुस्तकं वगैरे टिकणार का नाहीत ?' असे प्रश्न घेऊन चर्चा करणारे बरेच जण असतात. त्यातून , तसं हाती काही लागत नाही. पण चर्चा करणं ही आपली जन्मजात सवय. मग , अशावेळी ' उठाठेव ' सारखे वेगवेग‍ळे ऑनलाइन ग्रुप महत्त्वाचे वाटतात. इथे , बऱ्याच गोष्टींवर अगदी मूलभूत आणि बऱ्यापैकी सीरीअस चर्चा होते. शाब्दिक मारामाऱ्या झडतात. पण , शेवटी चांगले वा वाईट काही ना काही फलित प्रत्येकाला मिळते. शिवाय इथली सगळी माणसं ओपिनियन मेकर , बरेचसे कृतिशील कार्यकर्ते. त्यामुळे ती चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत राहते. आपलेही विचार घडवत राहते. अवधूत परळकर , कविता महाजन , सतीश तांबे अगदी कोल्हापुरचेच विनय गुप्ते , पांडूरंग सांगलीकर नावाचा एक आय.डी. असे बरेच जण असतात यामध्ये. शिवाय ऑनलाइन चर्चा असल्यामुळे जात , वय , भाषा , वय अशी बंधने फारशी आड येत नाहीत. मला तर कधीकधी चॅनेलवरच्या चर्चेपेक्षा या ऑनलाइन चर्चा अधिक महत्त्वाच्या , सिरीअरली दखल घेण्याजोग्या वाटतात.

असे अजून बरेच अनामिक आहेत. जे आपापल्या परिने आपली संस्कृती जपत आहेत. काळाच्या बदलांप्रमाणे तीला मोल्ड करत आहेत. नव्या रूपात , नव्या पीढीपुढे मांडत आहेत. मग , तो सर्व जुन्या कवींच्या कविता नेटवर आणणारा ब्लॉगर असो , पुलंच लिखाण ऑनलाइन आणणारा माणूस असो वा काळाची पावले जाणून आपले सगळे लिखाण मोफत ऑनलाइन उपलब्ध करणारे ज्येष्ठ लेखक चं. प्र. देशपांडे असोत. नव्या जगाचे मला हे सारे सांस्कृतिक शिलेदार वाटतात. मराठी ब्लॉग विश्व , मायबोली , मिसळपाव सारखी संस्थळे ही तर कायमच चर्चेत येतात. पण , आपण दर मराठी दिनाला त्यांच्याबाबत लिहिण्यापलिकडे पारसं काही करत नाहीत. याऊलट , गेल्या 5-7 वर्षात ही नवी माध्यमे इतकी साहित्यिकदृष्ट्या समृद्ध झाली आहेत , की त्यांच्या आता भाषिक , सामाजिक , राजकीय अंगाने अभ्यास करायची गरज निर्माण झाली आहे. बऱ्याचदा आपण एका प्रवाहासोबत जात असतो. पण , आपल्याही नकळत एखादा समांतर प्रवाहही जात असतो. त्याच समूहाला भेटायला. हे दोन प्रवाह एकत्र आले तर एक सुंदर नदी बनू सकते. साहित्य-संस्कृतीच्या बाबतीत तशी ती व्हावी यासाठी... महाराष्ट्र टाईम्स
(4 april 2013)