मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

एक पॅकेट उम्मीद...!!!

आपल्याला जगायला काय लागते? अन्न, पाणी, छे. मला ते महत्त्वाचे वाटत नाही. आपल्याला जगायला लागते ती आशा, जगण्याची इच्छा. तीच नसेल, तर या सार्याचा उपयोग तरी काय? नाही का... नाहीतर, दररोज फक्त पाट्या टाकणारे लोक आहेतच की आजूबाजूला.

तसं, नवीन वर्ष सुरु झालं की आपण सगळेच नवीन संकल्प करतो, प्लॅन्स बनवतो, जुन्या वर्षाचा आढावा घेतो. यावेळी आपण एक बेसिक प्रश्न विचारुया. ‘जगणं म्हणजे काय?’ किंवा ‘आनंदी जीवन म्हणजे काय?’ उत्तरं अर्थातच वेगवेगळी असतील. ती राहू द्यात तुमच्याकडेच... आपण, काही ‘सच का सामना’ खेळत नाही आहोत. पण, माझं उत्तर मी तुम्हाला सांगतो. आयुष्यातला प्रत्येक क्षणाला पॉझिटिव्हली, आनंदाने सामोरे जाणं म्हणजे जगणं. एखादी गोष्ट पूर्ण अनुभवणं महत्त्वाचं. हसायचं तर भरपूर हसायचं. रडायचं तर भरपूर रडायचं. जे काही करायचं ते मनापासून.

पण, अशी कितीही फिलॉसॉफी झाडली, तरी प्रत्यक्षात हे सगळं १००% जमणं अवघडच. त्यात, गेल्या वर्षात निराशेचे सूर जरा जास्तच आळवले गेले. भ्रष्टाचार, नैसर्गिक आपत्ती, मुंबईतले बॉम्बस्फोट, जागतिक मंदी, असं सारं झाल्यावर चेहरा आनंदी ठेवता येणार नाहीच. अगदी बरोबर. पण, इथे मुद्दा येतो तो ऍटिट्युडचा. हा त्रास तर सगळ्यांनाच झाला. पण, हा त्रास जो जसा झेलेल तसा तो पुढे जाईल. म्हणजे, काही जण ‘आता पुढे काय होणार?’ म्हणत ओरडत राहतील. काही जण ‘जगाचा अंत २०१२ ला होणारच’ म्हणून गप्पा छाटत बसतील आणि, फार थोडे लोक, हे एक कालचक्र असतं. जसं खाली आलंय, तसं वरही जाणार हे ओळखतात आणि त्याच जोमाने काम करत राहतात. अर्थातच, नंतर त्यांना ऍडव्हांटेज मिळते, हे वेगळे सांगणे न लगे.

ही अशी ऍटिट्यूडची गरज मला तर रोज जाणवते. आणि, ‘एक पॅकेट आशा’ किती महत्त्वाची आहे ते पण!!! तरुणच आम्ही, परीक्षा, निकाल, प्रेमात पडणे आणि ब्रेकअप या गोष्टी आमच्यासाठी तर एकदम कॉमन. पण, पुन्हा मुद्दा तुम्ही त्या गोष्टी कशा घेता यावरच डिपेंड... नाहीतर वृत्तपत्रातले वेगवेगळे मधले तुम्ही वाचताच. ही म्हण जुनीच आहे, पण, सध्याच्या तणावाच्या जगात जास्त महत्त्वाची. ‘ग्लास अर्धा भरलेला का अर्धा रिकामा हे तुम्ही ठरवायचं.’

बाकी ८५:१५ तत्व तर आता ‘मॅनेजमेंट गुरु’नी लोकप्रिय केलं आहेच. मलाही पटले ते, ‘आयुष्यात १५% गोष्टी घडणे आपल्या हातात नसते. पण ८५ % गोष्टी मात्र आपण त्यावर तशी प्रतिक्रिया देतो, यावर ठरतात. अगदी खरंच ना... पण, आजकाल ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’ अशा कोर्सेसचे जे पेव फुटले आहे नाक, त्याची मला खरंतर काही गरज वाटत नाही. कारण, मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपण स्वत:मध्ये डोकावूनच बघत नाही. गडबड, धांदल, फेसबुकवरील हजारो मित्र, एसएमएस यात स्वत:ला वेळ दिलाय? आपल्या शरीराला आणि मनाला वेळ दिलाय? तो दिला की सगळं चुटकीसरशी संपतं, मग, हे करण्यासाठी कोर्सला पैसे कशाला घालवायचे बरं???

इन शॉर्ट, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ही आजच्या जगातल्या बर्याच प्रश्नांच्या उत्तराची हिंट आहे. असं मला वाटतं, अर्थात, हे सगळं मला जमतयंच, अशातला काही भाग नाही आहे. पण, हेच जमवायला लागेल असं नक्की वाटतंय. आणि, फुकटचा सल्ला देतोय. वाटला घ्या, नाहीतर सोडून द्या. सिंपल...!!!
म्हणजे, आनंदाची बेट आहेत आपल्या आजूबाजूला. तिथं जायलाच हवं. मग, ते एखादं निवांत उडणारे फुलपाखरु असेल. छानसं गाणं असेल, वा जीवन फुलवणारे ‘मुक्तांगण’, ‘आनंदवन’ सारखे प्रकल्प असतील. नोकरशाहीच्या दलदलीतून वर आलेले ‘ई श्रीधरन’ सारखे लोक असतील. असं बरेच काही. आपली नजर फक्त त्यांच्यावर जायला हवी. गालिबनं म्हटलं आहेच. ‘नजरिया बदलो, नजारे बदल जाएंगे...’

परवा सहज नेटवर कौशल इनामदारचं एक गाणं सापडलं. ‘एक पॅकेट उम्मीद’ आणि तेव्हा लक्षात आले. आपल्या सार्यांना त्याचीच गरज आहे. चिमूटभर आशेची. ती सर्वांना मिळो या नववर्षाच्या सदिच्छा.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा