मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

जिंदगी जिंदाबाद...

काही काही दिवस आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे  असतात... जपून ठेवण्याजोगे... कालचा दिवस त्यातलाच एक. ‘वेगवेगळ्या माणसांना भेटणं ही खूप आनंददायक मेजवानी असते’ असं मला वाटायचं. काल त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झालं.

तर, ज्याला मी काल भेटलो, त्याचं नाव होतं लुईस पामर. मला भेटलेला पहिला परदेशी माणूस आणि तोही साधासुधा नव्हे, तीनदा जवळपास सगळं जग फिरलेला. धडपड्या, पर्यावरणप्रेमी. एकदा सोलर टॅक्सीतून, तर एकदा इलेक्ट्रिक कारमधून... कंप्लिट अवलिया.

त्याला भेटायला जाताना छातीत धडधडत तर होती. पण, फोनवरचा त्याचा निवांतपणा बघूनच मी रिलॅक्स झालो. जग फिरल्याचा आविर्भाव, पोक्तपणा तर कुठेच नाही. काय, कसा आहेस असा निवांतपणा. साधी, सरळ बोलण्याची शैली आणि झपाटून टाकणारा उत्साह. खराखुरा माणूस बघायची संधी होती ती. अनोळखी माणसाशी आपण कोणत्याही मुखवट्याशिवाय वागतो. तसंच हे काहीसं. ती हॉटेलच्या कॉरीडॉरमधली २० मिनिटं समृद्ध मात्र करुन गेली.

हॉटेल ते कॉलेज हा प्रवास तर त्याहून मजेशीर. माझ्या गाडीच्या पाठीमागून येणार्या दोन इलेक्ट्रिक कार. वेगळ्या आकारामुळे रस्त्यावरच्या सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे लागलेल्या आणि आपल्या गावातल्या फक्त चांगल्या आणि चांगल्याच रस्त्यावरुन त्यांना न्यायचा माझा प्रयत्न. सारंच मजेशीर. आमच्या गावात १० लाख लोक राहतात याचंच त्यांना आश्चर्य वाटलेलं. त्या प्रवासात त्यांना आणखी काय, काय वाटलं असेल, देव जाणे.
पामरकडून मिळालेले धडे मात्र त्याहून महत्त्वाचे आहेत. आम्ही गेल्या गेल्याच तो म्हणाला की, सहसा इथे भारतात वेळ पाळली जात नाही, आजही तसंच होईल असं वाटलं होतं. म्हणून आमचे सहकारी अजून नाष्टा करत आहेत. त्याबद्दल सॉरी. आपणच आपली इमेज कशी खराब करुन घेतोय त्याचे हे उत्तम उदाहरण.
भारत कसा वाटला? या प्रश्नाला चांगला आणि वाईट असे उत्तर. काही ठिकाणच्या सुविधा, रस्ते खूप आवडले, तर काही ठिकाणी अगदी शिव्या द्यावा असं वाटलं, असं सांगायचा प्रामाणिकपणा. पण, त्यानंतर तो जे काही बोलला ते मात्र विचार करण्याजोगं होतं. तो म्हणाला, ‘आम्हाला भारतात खरा भारत बघायचा आहे. अशा गोष्टी ज्या फक्त इथेच घडतात, इथेच मिळतात, नाटके आदिदास ची दुकानं काय जगभर सगळीकडे आहेत. पण, खूप ठिकाणी आम्हाला हेच सारे, कॉमन बघायला मिळाले. आपण, आपल्या देशाचे ब्रँडींग कशाप्रकारे करायला हवे याचे हे जणूकाही उत्तरच.

तो मूळ कामासाठी आला होता ते म्हणजे इलेक्ट्रिक कार दाखवायला. एका रॅली अंतर्गत. त्यासंदर्भात तो जे काही बोलला, ते तर डोळे उघडवणारेच होते. या क्षेत्रातदेखील चीनने जी मुसंडी मारलेली आहे, ते ऐकून प्रतिक्रिया द्यायलाच शब्द उरले नाहीत. बदलायला हवी ती मानसिकता. हे त्याचे शब्दच सारे काही बोलून गेले. भारतीयांची नस तर त्याने कधीचीच ओळखली असावी. कारण, ज्या पद्धतीने खुमासदार वाक्यांनी, विनोदांनी त्याने आपले बोलणे रंगवले, तेव्हा हे पाणी वेगळेच आहे, हे कळायला वेळ लागला नाही.

मला भेटलेला पहिला परदेशी, फेमस माणूस म्हणून मी त्याची स्तुती करत सुटलोय असं नाही. या माणसातही अनेक दोष असतीलच. पण, आपण फक्त चांगलेच गुण घेऊया ना, हे सारे काही ना काही शिकवून जात असतातच ना.. मला हा विरोधाभास तर खूप जाणवला. कारण, लुईस आलेला असतानाच आमच्यातलीच काही लोक आपल्या कृतीतून ‘आम्ही लहान आहोत’ हे सिद्ध करुन देत होते. मॅच्युअर व्हा रे आता.

असो, माणूस, वेळ यापेक्षा मला भावला तो मला मिळालेला अनुभव. वर्ल्डक्लास. इंग्लिश समजेल का याची धास्ती. मग एकदम आलेला कॉन्फिडन्स., रस्त्यावरुन जाताना सहजच आलेले हास्य. सार्या भावनांचा कोलाजच जणू. एक जगावेगळा अनुभव मिळाल्याचा आनंद. जगणे तरी दुसरे काय आहे? अशाच अनुभवांची शिदोरी.

विधात्याचे असंख्य आभार आहेत की, तो मला असे अनुभव देत आहे. ३ महिन्यांपूर्वीच अचानक मी ‘रेडिओ जॉकी’ झालो. त्यावेळीही असाच भावनांचा कोलाज मिळाला. सलीलदादाची मुलाखत हवी होती एकदा. रात्री १२-३० वाजता केशवरावच्या कट्ट्यावर बसून पाऊण तास आम्ही बोललो. काय एक्सपीरिअन्स होता तो. वा! प्रत्येकाला अशी संधी नक्की मिळणार आहे. आपण, फक्त त्या पकडायला हव्यात. जमेल तितक्या. मीही खूप सा-या सोडल्या. पण, ज्या मिळाल्या... वाह! असो, कालचा दिवस हा जगणं जगण्याचा दिवस होता माझ्यासाठी. सो, जिंदगी जिंदाबाद!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा