मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

नाच मेरी जान

ढिंका चिका, ढिंका चिका... गाणं लागले की पाय थिरकायला लागतातच. नाचण्यात, वेड्यासारखे नाचण्यात गंमत आहे आणि सुदैवाने मला ती गंमत कळाली. गणेश चतुर्थीचा आदला दिवस. कॉलेजमध्ये श्रींचे आगमन होणार होते. वेळ साधारण दुपारी एकची. ताशांचा आवाज ऐकू येऊ लागला आणि मेकॅनिकलच्या प्रेक्टीकलवरुन मी डायरेक्ट रस्त्यावर... कडेला उभा राहून मिरवणूक पाहू लागलो.

नाचायचे ठरवले तर होते, पण अजून गर्दीत जायचे मन होत नव्हते. कसे होणार? तसं मी गणपतीत नाचायचो, पण लिमिटमध्ये. त्यात माझी इमेज... कोण काय म्हणेल इ.इ... पण, मित्रांबरोबर शिरलो गर्दीत आणि अवघ्या ५ मिनिटांत भान विसरुन नाचू लागलो वेड्यासारखा. दमलो की, दोन मिनिटे थांबायचे आणि मग पुन्हा सुरु... आरडाओरड, दंगा, खांद्यावर चढणे.. सारे काही... आजूबाजूला असंख्य मुली आणि शिक्षक आपल्याकडे बघत आहेत, फोटो काढत आहेत, हे माहीत असूनही... जवळपास ३ तास नाचलो आणि खरं सांगतो, मनाला शांतता मिळाली.
फ्रेश झालो... दमल्यावर जेव्हा कट्ट्यावर बसलो, तेव्हा तो आनंद मला माझ्याच चेहर्यावर दिसला. नवीन काही गवसले, त्यावर तेव्हा भवताल नावाचा लेखही लिहिला. यावर कहर म्हणजे, दुसर्या दिवशी एक पोरगी ‘एफ बी’ वर चेष्टेत म्हणाली, छान नाचलास हां तू. ते काहीही असो. एक नवा मार्ग मिळाला. नाचणं, बेभान होणं आणि जगाची पर्वा न करता आपल्याच विेशात गुंग होणे. गॅदरिंग आले, गॅदरिंगला तर खास डी.जे.ची सोय. पण, मी मात्र स्टेजवर... स्टेज कमिटीत पहिल्या दिवशी सगळ्यांना नाचताना पाहिले आणि दुसर्या दिवशी मीही हळूच त्या गर्दीत सामील झालो.

खुर्च्या लोखंडाच्या होत्या म्हणून ठिक. एकाच बंदीस्त हॉलमध्ये २००० मुले एकाच वेळी नाचत आहेत. फार गजब एक्स्पीरीअन्स असतो तो..!! अगदी गॅदरिंगनंतर जेवतानाही आम्ही थिरकत होतो. अर्थात, त्या रात्री खूप शांत झोप लागली, हे वेगळे सांगणे न लागे! वर्गाची ट्रीप, गाडीत डी.जे. बनवलेला... येताना त्या अवघ्या २ फुटांच्या जागेत ५० जण नाचू लागलो. सरांनाही ओढले मग.. पोरींचा आणि पोरांचा ग्रुप वेगळा. २ तास पूर्ण धमाल. ही खरच एक अनएक्स्पेक्टेड ट्रीट होती. भरपूर मजा आली. गाडीतून उतरलो... रंकाळ्यावर गेलो सगळे मित्र आणि तिथे पहिल्यांदा रोमँटीसिजम अनुभवला. चंद्र, शांतता, मित्र इ.इ...आणि एखादी गोष्ट कशी भिनवावी होतो नाच पुन्हा शिकवून गेला. याहून कहर म्हणजे, इयर एंडचा कार्यक्रम. वर्गातला छोटेखानी कार्यक्रम तो. पण आनंद सेलिब्रेट करण्यासाठी नाचणं इतके मस्ट झालेले की, तिथल्या स्पीकरवर मोबाइलची गाणी लाऊन नाच सुरु. पोरांनी मधल्या काळात मला केक फासलेला, पण त्याच शर्टवर मी नाचत बसलेलो. सरांनी आता बास म्हणेपर्यंत आम्ही नाचतच राहिलेलो.

हुश्शऽऽ गेल्या वर्षभरात नाच हे कॉलेज लाइफमधला एक महत्त्वाचा हिस्सा बनून गेला होता. सगळ्यांचाच. खूप जणांसाठी ते अगदीच नैसर्गिक होते. पण, माझ्यासाठी जरा जास्तच महत्त्वाचे. नाचणं म्हणजे फक्त थिरकणं नव्हे; ती झिंग महत्त्वाची, ते बेभान होणे महत्त्वाचे. असे बेभान होणे जमले की, एखाद्या ध्येयामागे पिसाटल्यासारखे धावता येते.ऍटिट्यूड येतो तो अंगात. आपली इमेज, भवताल, कोण काय म्हणेल याचा खूप विचार करतो आपण. पण, हे नाचणे म्हणजे स्वतःसाठी जगणे. कोण मुर्ख म्हणो वा आणखी काही... हे जगणे म्हणजे नाचणे. मग नाचताना आपण कितीही वाईट दिसत असलो तरी... फक्त नाचणे नाही; ऊर फुटेस्तोवर नाचणे. अंग चोरुन काम करणे नाही. म्हणूनच, नाचणे म्हणजे तरुणाई, नाचणे म्हणजे जल्लोष. एक रीफ्रेशिंग डोस. त्यामुळे अधूनमधून नाचावं. कारण असो वा नसो.. तेवढे स्वतःचे २ तास पुढचे काही महिने तरी पुरतात. माझे भाग्य की, मला हा मार्ग सापडला आणि म्हणूनच म्हणावे वाटते, नाच मेरी जान...

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा