मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

थर्ड आय...

गेल्या काही दिवसात २ पुस्तके वाचली. ‘लवासा’ आणि ‘जैतापुरची बत्ती’ म्हटलं तर दोन्ही पुस्तकं वेगळी, म्हटलं तर बेस सारखाच.... दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आणि दोन सर्जनशील माणसांना (त्यातही एक अखंड आणि एक पत्रकार) त्याबद्दल लिहावं वाटणं आणि त्यासाठी अभ्यास करुन ते लिहिणं ... हे असं वाटणंच महत्त्वाचे आहे.

आजकाल.... नाहीतर, आपल्याला काय त्याचं म्हणून, मेंदू बाजूला काढून काठावर बसणंच वाढलंय.सो,अभिनंदन बोथ ऑफ यू..... प्रगतीचा मार्ग धरायचा असेल, तर हे दोन्ही प्रकल्प व्हायला हवेत. यात तशी शंका नाही. याला संपूर्ण विरोध केला तर, आपण काळाच्या पाठीमागे राहू, यात शंका नाही. प्रश्‍न आहे तो ते कसे व्हावेत याचा. या दोन्ही प्रकल्पांना विरोधक आहेत. आता विरोधाचे मुद्दे वगैरे नंतर तपासता येतील. पण, आग असल्याशिवाय धूर निघत नाही. सो, काही ना काही मुद्दे असणारच आणि त्याचा विचार व्हायला हवा. कारण, हे सारे प्रश्नच नवा मार्ग तयार करणार आहेत. ‘लवासा’मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स येत आहेत, तर ‘जैतापूर’च्या अणुभट्टीची कंपनी आहे, तिथे जगातले एकूण प्रकल्पच कमी असे मुद्दे आपली संस्कृती ठरवत असतात. सो, ‘सुवर्णमध्य’ हा कुठे तरी साधायची गरज आहे, हे मात्र स्पष्ट दिसतंय. पण, खरं सांगू का, खरं काळजीचे कारण हे नाहीच; ते आहे ते सिस्टीम. मान्य आहे, की ती कॉम्प्लिकेटेड असणार... पण, नक्की किती गुतांगुंतीची! हा कायदा, तो कलम ... निम्मी एनर्जी ही परवानगी घेण्यातच वाया जाणार. हे सोपं करता येणार नाही का? कायदा, मग कायद्याला येणार्‍या पळवाटा आणि मग तिथे निर्माण होणारी भ्रष्टाचाराची पायवाट. काही तरी करायला हवं! टेक्नॉलॉजी या सगळ्याला मदतगार ठरु शकेल? विचार करायला हवा...! महत्त्वाचं म्हणजे, हे सगळं लोकांपर्यंत सहज पोहोचायला हवं, समजायला हवं आणि ते सगळ्यात अवघड वाटतंय. ऍक्चुअली, आजकाल माध्यमांच्या या जमान्यात प्रत्येकजणच विचारवंत झाला आहे. आणि, अभ्यास असता, नसता प्रत्येक विषयावर बोलू लागला आहे. आणि, त्यातून तयार होतोय तो फक्त केऑस... आणि बघणा-‍या, ऐकणा-‍याला कळतच नाहीय नक्की काय चाललंय ते.

अर्धज्ञान अज्ञानापेक्षा वाईट असतं म्हणतात. आणि, म्हणूनच ख-‍या गोष्टी जनतेपुढे येणं आवश्यक आहे. नाहीतर मग, हत्ती आणि सात आंधळे यांच्या गोष्टीप्रमाणे गत होते. प्रत्येकाला जसं जाणवतंय तेच पूर्णसत्य असा प्रकार होऊन बसतो. आणि, तुम्ही, आम्ही, आपण, सगळे तरी या गोष्टींबाबत कितपत सीरीयस आहोत? अर्थात, रोजीरोटीच्या भानगडीत हे सगळं समजावून घेणं अवघडच. पण, कटाक्ष तरी हवाय. समाजाची म्हणून जी वैचारिक पातळी आहे, ती वाढवण्याची ही एक उत्तम संधी आहे. आपण ती घेतोय का? या विषयांवर गावोगावी, जिल्ह्याजिल्ह्यात चर्चासत्रे व्हायला हवीत, त्याचा विविध अंगांनी अभ्यास व्हायला हवा. कितपत होतोय तो? आणि, हे सारं होत असेल तर ते एका मर्यादित क्रॉस-सेक्शनपर्यंत सीमित तर नाही ना? आपण सगळेच सुस्त व्हायला नको, एवंढच वाटतंय मनापासून... आपण विचार केला किंवा नाही केला, म्हणून हे प्रकल्प व्हायचे थांबणार नाहीत. यात, गुंतलेला पैसाही एवढा आहे की, विरोध झाला तरी हे सारं उभं राहणारच. मग मुद्दा हा आहे की, या सा-‍यातून आपण काय बोध घेतो, काय शिकतो? कारण, आपल्या भविष्याची दिशा आपण कसं रिऍक्ट होतो, यावर ठरते. शेवटी काय, आपल्या विकासाचे होकायंत्र दुसर्‍या कोणाच्या हातात न जाता आपल्याच हातात रहावे एवढीच इच्छा...

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा