मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

साधी, सरळ गोष्ट

मी काही दिवसांपूर्वी तार्यांचे बेट पाहिला. अर्थात, तो मी पाहणार हे कधीपासून ठरलेले होते आणि, एकूणात तो मला आवडणार हेही जवळपास फिक्स होते. बालगंधर्वचा टाईप जोरात चालू होता. मात्र, काही निवडक लोकांनी या चित्राबाबत लिहिलं होतं आणि तेव्हाच आवडायची खात्री वाटत होती. सुदैवाने अपेक्षाभंग झाला नाही व आवडला, थोडासा वेगळा. तो अनुभव, मनात आलेले विचार शेअर करणं जास्त महत्त्वाचं आहे.

तर, या चित्रपटाची मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो आपल्याशी रिलेट करतो. जवळपास सर्वांशी. कोणाच्या घरात अशीच चित्रपटातल्यासारखी आजी असते, किशोर कदमने रंगवलेल्या एजंटसारखा एजंट कोणाला माहीत असतो. तर, कोणाचा असाच जुना वाडा असेल. माझ्याबाबतीत म्हणाल, तर माझे आजोबा कोकणात ड्युटीवर असताना मुंबईला बोटीनं जायचे. तो अनुभव त्यांनी मला सांगितला होता. तो मला रिलेट झालं, आठवलं... हे असं रिलेट होणं मला फार महत्त्वाचं वाटतं. कला हे खर्या अर्थानं समाजाचं प्रतिबिंब म्हणतात. ते यातून सिद्ध होतं. कारण, आजूबाजूला पाहिलं तर कला म्हणून जे काही दाखवतात त्याचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्षात किती संबंध येतो, देव जाणे!!! जे काही रिफ्लेक्शन येतं ते थोडंसं श्रीमंतवर्गाचं. हा चित्रपट मध्यम, उच्च मध्यम हा फार मोठा क्रॉस सेक्शन कव्हर करतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गणपतीचा एक कॅरॅक्टर म्हणून केलेला वापर. बेस्ट जमलाय तो!!! प्रायोगिक नाटकं बघत असल्यानं रुपकांचा वापर फार जवळून बघतो. पण, ती कळता कळत नाहीत हो..!! पण, इथं. जिंकलस मित्रा. खरंतर, माणूस आणि देव यांचं नातं तसं खूप कॉंप्लिकेटेड आहे. मागं एकदा मी म्हटलं होतं की, प्रेग्नन्सी चित्रपटात दाखवणं (नीट) अवघड, ते काम थ्री इडियट्सनं केलं. तसं हे देवाचं नातं या बेटानं दाखवलं आणि सर्वात महत्त्वाचं, हा सर्वार्थानं चित्रपट आहे.

छायाचित्रण, कलादिग्दर्शन या सर्व अंगांना यात तितकंच महत्त्व आहे. ते जाणवतं, मला त्या टेक्निकॅलिटीजमधलं काही कळत नाही. तरीही, त्याला दिलेला महत्त्व जाणवतो. प्रगल्भ निर्मितीचे हे लक्षण आहे असं मानायला हरकत नाही. त्यामुळे, चित्रपट पाहताना सुसह्य होतो.

आणि, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची साधी, सरळ गोष्ट. ना मेलोड्रामा, ना लाऊडनेस काहीच नाही!!! अगदी साधी, तरल.. मला, हे खूप आवडतं. श्रीयुत गंगाधर टिपरे, गंध, मुंबई-पुणे-मुंबई या मला आवडणार्या काही कलाकृती, आणि, या सर्वांची एकच कॉमन गोष्ट म्हणजे त्यांचे साधेपण. व्यावसायिकतेच्या नावाखाली उगाच मसाला नाही, आणि प्रायोगिक सपकपणा किंवा वैचारिक बोजडपणाही नाही. आलेल्या प्रत्येकाला ही प्रत्येक कलाकृती समजते. आनंद घेता येतो आणि जाता जाता ती फिलॉसॉफिकल डोसही देते, आपल्या नकळत. प्रयोग करु नयेत असं नाही, भपका दाखवू नये असंही नाही. पण, या सगळ्यांपेक्षा आपण सांगतोय ती गोष्ट महत्त्वाची. त्याहून आनंद असा वाटतोय की हे सगळं ‘व्यावसायिक’ चित्रपटात येतंय. ‘गंध’, ‘जोगवा’सारखे क्लास एका बाजूला आहेत (जे तिकीटवारीवर नाहीत.) तर दुसर्या बाजूला ‘गोंद्या मारतंय तंगड’ वा तत्सम मास. दोघांचंही आपलं स्थान आहे. पण, पूर्वी मुंबई-पुणे-मुंबई, इव्हन सनई-चौघडे हे क्लास आणि मासचं कॉम्बो होतं.

ता-यांचं बेट त्याचं पुढचं पाऊल असं म्हणायला हरकत नाही. असो, हा चित्रपट १००% परफेक्ट असं काही नाही. पिटफॉल्स आहेत. असूदेत. गंमतीचा भाग असा की, माझ्या दोन मित्रांना, ज्यांना मराठी चित्रपट बघणं आवडत नाही. त्यांना, या चित्रपटाला घेऊन गेलो होतो, ‘एकता कपूर प्रॉडक्शन’चं नाव सांगून. पिक्चर आवडला नाही तर उठून जाणार अशी धमकी मिळाली होती. त्यांनी चुळबूळ केली, पण, उठून काय गेले नाहीत. तेवढं बासं मला...!!!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा