मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

मला ऐकायचंय...

एखाद्या चांगल्या गोष्टीत आपला खारीचा वाटा असला तरी बरं वाटतं. निदान मला तरी...!!! काल तसंच झालं. आमच्या महापालिकेने आयोजित केलेली व्याख्यानमाला संपली. यात, थोडीशी मदत मी केलेली. पहिल्यांदाच, वैचारिक व्याख्यानमालेला १५०० क्षमतेचे नाट्यगृह ‘हाऊसफुल’ झाले. यासारखा दुसरा आनंद तो कोणता?

मला ऐकायला खूप आवडतं. अगदी मनापासून एखादे चांगले व्याख्यान हुकले की हळहळायला होते. आता दरवर्षी माझ्या परीक्षेच्या काळात इथे व्याख्यानं असतात आणि त्याला मला जाता येत नाही. हे माझे दुर्भाग्य. पण, आमच्या एजच्या मुलांनी असल्या गोष्टीला येणे हे किंचितसं आऊटडेटेड झालंय. टी.व्ही., मोबाईल असताना एकाच माणसाला दीड तास ऐकायचं? त्यामुळे, बळजबरीने आलेली काही जण व्याख्यानात पण गेम खेळत बसतात.

पण, मला हा प्रकार आवडायचा, त्यासाठी काही खास कारणं आहेत. आता माझं वय रनिंग १९, या वयात मला स्वत:चा असा किती अनुभव मिळालाय? फार कमी. मग, एवढ्या मोठ्या विश्वाचे हे जे असंख्य रंग आहेत ते मला कधी कळणार? मी समृद्ध कधी होणार? त्यासाठी हा एकमेव पर्याय आहे, आणि आजच्या स्पर्धेच्या जगात बहुश्रृतता लागतेच. तेलाच्या राजकारणाचा माझ्याशी काय संबंध असे म्हणून चालत नाही आणि अशा गोष्टी निरखून मिळत नाही. नेटवरुन मिळते ती भरमसाठ माहिती, त्यातलं ज्ञान मिळवायला प्रचंड वेळ जातो. पण, इथे समोर बोलणार्या अभ्यासकाने तो अभ्यास आधीच केलेला असतो. मग, मिळवा ना रेडीमेड. याशिवाय, प्रत्येक माणूस म्हणजे एक पुस्तक असते. ते जर का नीट उलगडले गेले तर अनुभवाचा धबधबा वाढू लागतो आणि, जगण्याचे असंख्य डोस सहज मिळून जातात आणि, मग जगणं मॅच्युअर होऊन जातं. हा माझा स्वत:चा अनुभव आहे.

मला स्वत:ला व्याख्यानात अजून एक फॅसिनेटींग वाटतं ते व्याख्यानाचं कौशल्य. मी मूळचा नाटकातला. त्यामुळेच फक्त आपल्या आवाजानं समोरच्या समुदायाला आपल्या गुंतवून ठेवणं, नाट्य उभं करणं, मंत्रमुग्ध करणं ही गोष्टच मला प्रचंड भावते. माझ्या सुदैवाने बाबासाहेब पुरंदरे, प्रा. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, पणशीकर या सार्यांना मला ऐकायला मिळतं आणि, प्रत्येकवेळी मला हेच कुतूहल वाटलं.
हे सगळे माझे वैयक्तिक अनुभव. पण, अशी एक सार्वत्रिक ओरड आहे की व्याख्यानांना लोक येत नाहीत, तरुण तर नाहीतच आणि काही प्रमाणात ते खरं आहे, अर्थात. समुद्रातल्या बेटांसारख्या काही व्याख्यानमाला चालतात. पण, तो अपवाद. मला स्वत:ला असं वाटतं की व्याख्याते, आयोजक यांच्यासाठी हा एक कसोटीचा काळ आहे. त्यांनी येणार्या जगाला काय पाहिजे, हे ओळखलं तर अशी वेळ येणार नाही.

म्हणजे बघा, हा मी एका भाषणाला गेलेलो. वक्ता उत्तम बोलला. पण विषय होता, ‘गांधी आणि टागोर यांच्यातील पत्रव्यवहार. आता या विषयाला तरुण का येतील? खरं सांगतो. आजच्या पिढीला वेळ नाही, त्यामुळे ज्या गोष्टींना आमच्या जगण्यावर फरक पडतो. अशा विषयांनाच आता महत्त्व राहणार, याची जाणीव हवी. इतिहास महत्त्वाचा आहेच. प्रचंड महत्त्वाचा आहे. त्याने खूप काही शिकवलंय. पण त्याचा वर्तमानाशी रिलेव्हन्स. भविष्यात त्याचा कसा वापर करायचा हे सांगायला हवं. याउलट, असंख्य लोक इतिहासातच अडकून बसतात.

अर्थात, ‘ब्रँडीग’ हा भाग महत्त्वाचा ठरतोय. व्याख्याने म्हणजे रटाळ असा जो समज काही प्रमाणात आहे, तो बदलायला हवा. म्हणजे कसं आहे, आम्हाला नाट्यसंगीत ऐक म्हटल्यावर आम्ही ऐकणार नाही, पण, बालगंधर्वांची गाणी ऐक म्हटल्यावर ऐकणार. चूक की बरोबर हा मुद्दा गौण. पण, आज प्रेझेंटेशनलाच महत्त्व आहे, एवढे मात्र नक्की. असो, आम्ही काही ऐकतंच नाही असं नाही. (मिनिटांच्या विश्वास नांगरे-पाटलांच्या भाषणाची क्लिप नेटवर जोमात आहे. अब्दुल कलाम, जॉब्स यांची भाषणंही सो, आम्ही ऐकतोय. पण, फार कमी. दुस-या बाजूला प्रत्येक गावात दररोज एखादे व्याख्यान असतेच. विचारवंतांची संख्या वाढलीय. याचा सुवर्णमध्य काही व्याख्यानमालेतून होतो. तसा तो काल झाला) आणि मला पामराला आनंद झाला. जीभ, डोळे इ. इंद्रियांना इंद्रियसुख आपण सारखे देतोच, तसे ते कानालाही मिळत जाऊ दे आणि प्रगल्भ समाज घडू दे, याच सदिच्छा.

बा वक्त्या, येथून पुढे जेव्हा तू माईकसमोर येशील. माईक ऍडजस्ट करशील. त्याच क्षणी माझे कान मी तुझ्या स्वाधीन केलेले असतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा