मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

आयडिया' है क्या???

आजच्या जमान्यात नक्की कशाची चलती आहे? मध्यंतरी मला हा प्रश्न पडला होता. तेव्हा जरा इकडे-तिकडे नजर टाकली. तर असं जाणवलं की, पैसा, सत्ता, ताकद यांची चलती असायचा जमाना केव्हाचा गेला. आज जमाना आहे तो नवनव्या संकल्पनांचा, इन शॉर्ट, डोकॅलिटीच... मग, बाकीच्या गोष्टी आपोआपच येतात. फेसबुक हे त्याचे अत्युत्तम उदाहरण. फेसबुककडं स्वतःचं असं काहीही नाही. माणसांचीच माहिती, त्यांच्याच गप्पा... फक्त, त्या सार्यांना जोडणारी एक भन्नाट आयडिया. आज जेव्हा फेसबुक शेअर मार्केटमध्ये आलं, तेव्हा त्याची एवढी किंमत झाली की ती मोजतानाच डोळे पांढरे व्हायची वेळ येते. आजच्या जमान्यात एखाद्या `कन्स्पेट'ला मिळालेला हा कदाचित सर्वात मोठा आर्थिक सन्मान. अशीच एक गोष्ट परवाच भारतात पण घडली. दोन बहीण-भावांनी मिळून एक वेबसाईट तयार केली. थोडा काळ `डेव्हलप' केली. आणि, परवाच एका मोठय़ा कंपनीला विकून टाकली. किंमत होती फक्त 600 कोटी.

सध्या रश्मी बन्सलचे `स्टे हंग्री, स्टे फुलीश' वाचतोय. अशाच जवळपास 30 उद्योजकांच्या कहाण्या... बाकी सारे मुद्दे आहेत. पण, या सार्यांच्या डोक्यात असणार्या भन्नाट आयडिया हा त्यांच्या यशातला सगळ्या मोठा भाग. कोणी किराणा माल कमी दरात विकला, तर कोणी नोकर्यांचा शोध नेटवर घेणे सोपे केले. मग गेल्या 20 वर्षांत त्यांची भरभराटच झाली.

 अर्थात, आर्थिक फायदा मिळवणे, एवढेच म्हणजे यश नव्हे. आजची खरी ताकद ही अक्कल असणारा सामान्य माणूस झाली आहे. त्याचे डोके लावून तो आज अनेक छोटे-मोठे प्रश्न सोडवत आहे. लोकांचे भले करत आहे. आणि, मानसिक समाधान मिळवत आहे. कोणाच्या तरी डोक्यात आले. टॅक्सीवाल्यांना विरोध का करु नये, त्यातून `मीटर डाऊन' आले. तर कोणाच्या डोक्यात समारंभात अन्न वाया जाऊ नये म्हणून काही आयडिया येते. तर कोण, शेतकर्यांसाठी एसएमएस सेवा सुरु करतो. असे असंख्य सामाजिक उपक्रम आज जोरात सुरु आहेत, आणि त्याने काही प्रश्न थोडेफार का होईनात सुटत आहेत.

अशा सगळ्या नवनवीन उपक्रमांना `स्टार्ट अप्स' असं नाव दिलं गेलंय. आणि, त्यांची संख्या झपाटय़ानं वाढत आहे. त्यांच्या स्पर्धा होत आहेत. आयआयटीचे `आयडिएट' ही त्यातली एक मानाची स्पर्धा. महिंद्रा, टाटा अशा कंपन्यांनाही फक्त माणसे नको आहेत. त्यांना, हव्या आहेत त्या नव्या कल्पना. प्रत्येकाने स्वतःची स्पर्धा काढली आहे.

तिथं जाऊन आपण एकच काम करायचं; जर आपल्या डोक्यात एखादी कन्सेप्ट असेल, जी समाजाच्या कोणत्याही भागात किंवा अगदी एखाद्या कंपनीत थोडा बदल घडवू शकत असेल किंवा तुम्ही काहीतरी नवीन, वेगळी गोष्ट तयार केली असेल, तर ती सांगायची. जर त्यांना ती आवडली, तर मार्गदर्शन सगळं त्यांचं. तुमचं फक्त डोकं, आणि काय हवं??

अर्थात, नव्या कल्पनांना पूर्वी कधी संधी नव्हतीच, असं काही नाही. पण, आज ती मोठय़ा प्रमाणावर वाढलीय एवढं नक्की. अर्थात, त्याला कारणेही बरीच आहेत. आता ज्ञानावर कोणतीही बंधने उरली नाहीत. एखादा आफ्रिकेतला माणूस जपानच्या माणसाला त्याची आयडिया सांगू शकतो, आणि तो जपानी युरोपीय माणसांना बरोबर घेऊन ती अंमलात आणू शकतो. थोडक्यात, मनाच्या धावेला आता कोणतेही बंधन नाही, आणि अशावेळी मनाची धाव ही कायम चार हात पुढे असते. ज्ञानाच्या महासागरात आपल्या मेंदूची करामत सोडली की झालं. त्यात ना डिग्री आड येते, ना गाव. आणि, म्हणूनच प्रत्येक देश हा नव्या संकल्पनांमागे धावत आहे.
इथं मला अरुण देशपांडेचं एक वाक्य आठवलंय, ते म्हणाले, `आपल्याला शारीरिक नव्हे, तर बौद्धिक आळस आलाय.' पटलं मला ते. कारण, आपल्याकडे पेटंट मिळविण्यासाठी स्पर्धा लागायच्या ऐवजी डिग्री आणि जॉब मिळवायसाठी स्पर्धा लागलेली आहे. ती असावीच; पण थोडं इकडं लक्ष द्यायला काय हरकत आहे? अगदी जाता येता आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात. पण, `याचं पुढं काय होणार?' असं म्हणून आपण तो विचार सोडून देतो. बरं, दोस्त यापुढे असा विचार सोडून द्यायच्या आधी होल्ड ऑन, कदाचित तोच तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतो. कारण येथून पुढे लोक `डिग्री है क्या?' विचारायच्या ऐवजी `आयडिया है क्या?' असं विचारु लागतील. तीच काळाची गरज होत चाललीय. सो, `गेट ऍन आयडिया सरजी...'

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा