मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

‘बीकॉज, यू कान्ट...

आज मी जाम खूष आहे. कपिल सिब्बल साहेबांनी सोशल नेटवर्किंग साईटवर अलमोस्ट सेन्सॉरशिप आणायचा विचार चालवलाय ना. फायनली, त्यांना ही जनता दखल घेण्याजोगी वाटली तर. नाही, त्याचं कसं आहे,

अण्णांच्या आंदोलनावेळी ‘सोशल नेटवर्किंग म्हणजे अख्खा देश नव्हे, तिथे सपोर्ट आहे म्हणजे अख्खा देश पाठीशी आहे, असे नव्हे’ अशी मुक्ताफळे बर्याच लोकांनी (त्यात नेतेही होते) टीव्हीवरच्या चर्चात उधळली होती. त्यामानाने निदान आज त्यांनी मान्य तरी केले की, देशाचा एक मोठा क्रॉस सेक्शन हे नेटवर्किंग करतो, हेही नसे थोडके..

राहता राहिला मुद्दा सेन्सॉरशिपचा, तर तशी ती काही लादता येत नाही. सो, जस्ट फरगेट इट... हे म्हणजे समुद्राला बांध घालण्यासारखं झालं. बरेचसे सर्व्हर आधीच आहेत परदेशात, ते बंद करणे एवढे सोपे नाही आणि एवढी लोकं वापरतात फेसबुक. झुकरबर्ग किती जणांवर (म्हणजे त्याची कंपनी) लक्ष ठेवणार बापडा? बरं एक साईट बंद केली, तर दुसरी येतेच आणि ‘सेंड टू ऑल’ म्हणून एकावेळी सेंकदात हजारो लोकांपर्यंत पोहोचते राव माहिती... ती कोण, कुठून, कशी थांबवणार? यांच्यावर कंट्रोल असू शकत नाही. सध्यातरी पैसा असो वा सत्ता, हे काहीही या माध्यमाला पूर्ण नियंत्रणात आणू शकत नाही आणि खूप जणांची हीच खरी दुखरी नस आहे.

असो, पण आता एवढा विषय काढलाच आहे तर होऊन जाऊ दे चर्चा. पहिली गोष्ट म्हणजे, या साईट्सवरती जर काही आक्षेपार्ह आले, तर ते सांगण्याची, ती गोष्ट नष्ट करण्याची सोय ऑलरेडी आहे. ‘मार्क ऍज स्पॅम’ म्हणून ठराविक प्रमाणात असे स्पॅप झाले की, आपोआप नष्ट होते ते.. म्हणजे, सेन्सॉरशिप आहे, मॉरल सेन्सॉरशिप... सगळ्यात पहिल्यांदा हे डोळ्यात घ्यायला हवे की मुक्त म्हणजे उत्छृंखल नव्हे... फेसबुकवर चर्चिलेले विषयही सिरीयस असतात. प्रुव्ह झालंय नुकतंच... आता थोडा उलटा विचार करा... ही सोय असताना सरकारला आक्षेपार्ह वाटतात अशा गोष्टी का उरतात मग इथे? याचा अर्थ, त्या गोष्टींना कमी-अधिक प्रमाणात का होईना जनाधार आहे आणि या नव्या मीडियमच्या तत्त्वात अशा गोष्टी उडवणे बसतच नाही.
 व्यंगचित्रांची, व्यक्तिगत टीकेची तर आपल्याला सवय आहेच, जुनी परंपरा आहे ती आणि राहता राहिला मुद्दा अश्लीलतेचा तर असंख्य पोर्न साईट सर्वांनाच एक क्लिकवर खुल्या आहेत. त्यामानाने इथे जे काही चालतं, ते किस झाड की पत्ती...

थोडा हाक्स्ट्रीम विचार केला आणि उलट्या नजरेनं पाहिलं तर या साईट शांतता वाढवण्यात हातभारच लावत आहेत. म्हणजे बघा, पूर्वी एखादी गोष्ट घडली की हजारो जण चिडायचे आणि त्यातले किमान १० तरी काहीतरी प्रत्यक्ष कृतीत आणायचे. आता मात्र एखादी घटना १ लाख लोकांना कळते, त्यातले ९९,९९९ लोक फेसबुकवर कॉमेंट टाकून गप्प बसतात आणि एखादाच प्रत्यक्षात काही करतो. बघा, किती निरुपद्रवी माध्यम नाही का हे?
हां, त्यांचा अर्थ असा नव्हे की, हे नेटवर्किंग म्हणजे सगळं चांगलंच. होय, इथेही विकृती आहेत. वाईट गोष्टी आहेत. भावनिक तेढ निर्माण करायचे प्रयत्न होतात. अगदी मान्य... पण, म्हणून हे सारे बंडच करा... हा त्याच्यावरचा उपाय नाही होत. मनापासून सांगतो, देशाचा मंत्री खासगी वेबसाईटला विनंती करतो, इशारा देतो हे मला तरी इमॅच्युअरिटी दाखवते असं वाटतं. मला सांगा अशा वाईट गोष्टी करणारे माथेफिरु कोठे नाहीत हो? त्यांना टाळणे हाच त्याच्यावरचा रामबाण मार्ग असतो आणि त्यासाठी लागते ती वैचारिक प्रगल्भता... तिचा विकास होण्यासाठी करत का कोणी नाही? नवं माध्यम आहे, मग ते लोकांना समजाविण्यासाठी, पाय घसरण्याचे चान्सेस कुठं आहेत,
 
ते सांगण्यासाठी काही सिस्टिमॅटिक प्रयत्न होत आहेत का? या माध्यमांचा आपल्या देशाच्या संदर्भात शास्त्रीय, मानसशास्त्रीय अभ्यास होतोय का? त्यानुसार काही उपाय होत आहेत का? कदाचित, यातले काही मुद्दे मी आधीदेखील मांडले आहेत. पण, मला या सार्यांचीच गरज वाटत आहे. पुन:पुन्हा हे नवे मीडियम म्हणजे दुधारी शस्त्र आहे. ते नीट वापरलं ना तर खरोखर जग बदलता येईल, नाहीतर माध्यम विकसित होताना चुका होणार, वाईट गोष्टी घडणार... पण, आपलं लक्ष, प्रयत्न मात्र ते अधिक नीट कसं वापरता येईल, यावर हवं. म्हणजे, असल्या फालतुगिरीची गरजच वाटणार नाही.

असो, आधी कपिल सिब्बलांची पत्रकार परिषद आणि नंतर दोन दिवसात आलेल्या लाखो प्रतिक्रिया.. उगाचंच घडलं काहीतरी... आज मी जरा अधिकच आक्रमक, भावनिक झाल्याचं जाणवले. बर्याच जणांना... खरं आहे ते, इतकं मुक्त आणि प्रामाणिक लिहिता येतं या फेसबुकवर, ब्लॉगवर. किंबहुना याच्याहून जहाल. त्याची ही सेन्सॉर झलक. बाकी, सिब्बल साहेबांबाबत फार आदर होता मनात, उच्च शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले काही निर्णय जाम आवडलेले. पण आता एक सामान्य तरुण म्हणून त्यांना सांगावं वाटतंय की सोशल नेटवर्किंगवर बंधने घालणे (आणि, कदाचित देश चालवणेही) तुम्हाला जमणारे नाही. बिकॉज, यू जस्ट कान्ट...

जिंदगी जिंदाबाद...

काही काही दिवस आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे  असतात... जपून ठेवण्याजोगे... कालचा दिवस त्यातलाच एक. ‘वेगवेगळ्या माणसांना भेटणं ही खूप आनंददायक मेजवानी असते’ असं मला वाटायचं. काल त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झालं.

तर, ज्याला मी काल भेटलो, त्याचं नाव होतं लुईस पामर. मला भेटलेला पहिला परदेशी माणूस आणि तोही साधासुधा नव्हे, तीनदा जवळपास सगळं जग फिरलेला. धडपड्या, पर्यावरणप्रेमी. एकदा सोलर टॅक्सीतून, तर एकदा इलेक्ट्रिक कारमधून... कंप्लिट अवलिया.

त्याला भेटायला जाताना छातीत धडधडत तर होती. पण, फोनवरचा त्याचा निवांतपणा बघूनच मी रिलॅक्स झालो. जग फिरल्याचा आविर्भाव, पोक्तपणा तर कुठेच नाही. काय, कसा आहेस असा निवांतपणा. साधी, सरळ बोलण्याची शैली आणि झपाटून टाकणारा उत्साह. खराखुरा माणूस बघायची संधी होती ती. अनोळखी माणसाशी आपण कोणत्याही मुखवट्याशिवाय वागतो. तसंच हे काहीसं. ती हॉटेलच्या कॉरीडॉरमधली २० मिनिटं समृद्ध मात्र करुन गेली.

हॉटेल ते कॉलेज हा प्रवास तर त्याहून मजेशीर. माझ्या गाडीच्या पाठीमागून येणार्या दोन इलेक्ट्रिक कार. वेगळ्या आकारामुळे रस्त्यावरच्या सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे लागलेल्या आणि आपल्या गावातल्या फक्त चांगल्या आणि चांगल्याच रस्त्यावरुन त्यांना न्यायचा माझा प्रयत्न. सारंच मजेशीर. आमच्या गावात १० लाख लोक राहतात याचंच त्यांना आश्चर्य वाटलेलं. त्या प्रवासात त्यांना आणखी काय, काय वाटलं असेल, देव जाणे.
पामरकडून मिळालेले धडे मात्र त्याहून महत्त्वाचे आहेत. आम्ही गेल्या गेल्याच तो म्हणाला की, सहसा इथे भारतात वेळ पाळली जात नाही, आजही तसंच होईल असं वाटलं होतं. म्हणून आमचे सहकारी अजून नाष्टा करत आहेत. त्याबद्दल सॉरी. आपणच आपली इमेज कशी खराब करुन घेतोय त्याचे हे उत्तम उदाहरण.
भारत कसा वाटला? या प्रश्नाला चांगला आणि वाईट असे उत्तर. काही ठिकाणच्या सुविधा, रस्ते खूप आवडले, तर काही ठिकाणी अगदी शिव्या द्यावा असं वाटलं, असं सांगायचा प्रामाणिकपणा. पण, त्यानंतर तो जे काही बोलला ते मात्र विचार करण्याजोगं होतं. तो म्हणाला, ‘आम्हाला भारतात खरा भारत बघायचा आहे. अशा गोष्टी ज्या फक्त इथेच घडतात, इथेच मिळतात, नाटके आदिदास ची दुकानं काय जगभर सगळीकडे आहेत. पण, खूप ठिकाणी आम्हाला हेच सारे, कॉमन बघायला मिळाले. आपण, आपल्या देशाचे ब्रँडींग कशाप्रकारे करायला हवे याचे हे जणूकाही उत्तरच.

तो मूळ कामासाठी आला होता ते म्हणजे इलेक्ट्रिक कार दाखवायला. एका रॅली अंतर्गत. त्यासंदर्भात तो जे काही बोलला, ते तर डोळे उघडवणारेच होते. या क्षेत्रातदेखील चीनने जी मुसंडी मारलेली आहे, ते ऐकून प्रतिक्रिया द्यायलाच शब्द उरले नाहीत. बदलायला हवी ती मानसिकता. हे त्याचे शब्दच सारे काही बोलून गेले. भारतीयांची नस तर त्याने कधीचीच ओळखली असावी. कारण, ज्या पद्धतीने खुमासदार वाक्यांनी, विनोदांनी त्याने आपले बोलणे रंगवले, तेव्हा हे पाणी वेगळेच आहे, हे कळायला वेळ लागला नाही.

मला भेटलेला पहिला परदेशी, फेमस माणूस म्हणून मी त्याची स्तुती करत सुटलोय असं नाही. या माणसातही अनेक दोष असतीलच. पण, आपण फक्त चांगलेच गुण घेऊया ना, हे सारे काही ना काही शिकवून जात असतातच ना.. मला हा विरोधाभास तर खूप जाणवला. कारण, लुईस आलेला असतानाच आमच्यातलीच काही लोक आपल्या कृतीतून ‘आम्ही लहान आहोत’ हे सिद्ध करुन देत होते. मॅच्युअर व्हा रे आता.

असो, माणूस, वेळ यापेक्षा मला भावला तो मला मिळालेला अनुभव. वर्ल्डक्लास. इंग्लिश समजेल का याची धास्ती. मग एकदम आलेला कॉन्फिडन्स., रस्त्यावरुन जाताना सहजच आलेले हास्य. सार्या भावनांचा कोलाजच जणू. एक जगावेगळा अनुभव मिळाल्याचा आनंद. जगणे तरी दुसरे काय आहे? अशाच अनुभवांची शिदोरी.

विधात्याचे असंख्य आभार आहेत की, तो मला असे अनुभव देत आहे. ३ महिन्यांपूर्वीच अचानक मी ‘रेडिओ जॉकी’ झालो. त्यावेळीही असाच भावनांचा कोलाज मिळाला. सलीलदादाची मुलाखत हवी होती एकदा. रात्री १२-३० वाजता केशवरावच्या कट्ट्यावर बसून पाऊण तास आम्ही बोललो. काय एक्सपीरिअन्स होता तो. वा! प्रत्येकाला अशी संधी नक्की मिळणार आहे. आपण, फक्त त्या पकडायला हव्यात. जमेल तितक्या. मीही खूप सा-या सोडल्या. पण, ज्या मिळाल्या... वाह! असो, कालचा दिवस हा जगणं जगण्याचा दिवस होता माझ्यासाठी. सो, जिंदगी जिंदाबाद!

मला ऐकायचंय...

एखाद्या चांगल्या गोष्टीत आपला खारीचा वाटा असला तरी बरं वाटतं. निदान मला तरी...!!! काल तसंच झालं. आमच्या महापालिकेने आयोजित केलेली व्याख्यानमाला संपली. यात, थोडीशी मदत मी केलेली. पहिल्यांदाच, वैचारिक व्याख्यानमालेला १५०० क्षमतेचे नाट्यगृह ‘हाऊसफुल’ झाले. यासारखा दुसरा आनंद तो कोणता?

मला ऐकायला खूप आवडतं. अगदी मनापासून एखादे चांगले व्याख्यान हुकले की हळहळायला होते. आता दरवर्षी माझ्या परीक्षेच्या काळात इथे व्याख्यानं असतात आणि त्याला मला जाता येत नाही. हे माझे दुर्भाग्य. पण, आमच्या एजच्या मुलांनी असल्या गोष्टीला येणे हे किंचितसं आऊटडेटेड झालंय. टी.व्ही., मोबाईल असताना एकाच माणसाला दीड तास ऐकायचं? त्यामुळे, बळजबरीने आलेली काही जण व्याख्यानात पण गेम खेळत बसतात.

पण, मला हा प्रकार आवडायचा, त्यासाठी काही खास कारणं आहेत. आता माझं वय रनिंग १९, या वयात मला स्वत:चा असा किती अनुभव मिळालाय? फार कमी. मग, एवढ्या मोठ्या विश्वाचे हे जे असंख्य रंग आहेत ते मला कधी कळणार? मी समृद्ध कधी होणार? त्यासाठी हा एकमेव पर्याय आहे, आणि आजच्या स्पर्धेच्या जगात बहुश्रृतता लागतेच. तेलाच्या राजकारणाचा माझ्याशी काय संबंध असे म्हणून चालत नाही आणि अशा गोष्टी निरखून मिळत नाही. नेटवरुन मिळते ती भरमसाठ माहिती, त्यातलं ज्ञान मिळवायला प्रचंड वेळ जातो. पण, इथे समोर बोलणार्या अभ्यासकाने तो अभ्यास आधीच केलेला असतो. मग, मिळवा ना रेडीमेड. याशिवाय, प्रत्येक माणूस म्हणजे एक पुस्तक असते. ते जर का नीट उलगडले गेले तर अनुभवाचा धबधबा वाढू लागतो आणि, जगण्याचे असंख्य डोस सहज मिळून जातात आणि, मग जगणं मॅच्युअर होऊन जातं. हा माझा स्वत:चा अनुभव आहे.

मला स्वत:ला व्याख्यानात अजून एक फॅसिनेटींग वाटतं ते व्याख्यानाचं कौशल्य. मी मूळचा नाटकातला. त्यामुळेच फक्त आपल्या आवाजानं समोरच्या समुदायाला आपल्या गुंतवून ठेवणं, नाट्य उभं करणं, मंत्रमुग्ध करणं ही गोष्टच मला प्रचंड भावते. माझ्या सुदैवाने बाबासाहेब पुरंदरे, प्रा. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, पणशीकर या सार्यांना मला ऐकायला मिळतं आणि, प्रत्येकवेळी मला हेच कुतूहल वाटलं.
हे सगळे माझे वैयक्तिक अनुभव. पण, अशी एक सार्वत्रिक ओरड आहे की व्याख्यानांना लोक येत नाहीत, तरुण तर नाहीतच आणि काही प्रमाणात ते खरं आहे, अर्थात. समुद्रातल्या बेटांसारख्या काही व्याख्यानमाला चालतात. पण, तो अपवाद. मला स्वत:ला असं वाटतं की व्याख्याते, आयोजक यांच्यासाठी हा एक कसोटीचा काळ आहे. त्यांनी येणार्या जगाला काय पाहिजे, हे ओळखलं तर अशी वेळ येणार नाही.

म्हणजे बघा, हा मी एका भाषणाला गेलेलो. वक्ता उत्तम बोलला. पण विषय होता, ‘गांधी आणि टागोर यांच्यातील पत्रव्यवहार. आता या विषयाला तरुण का येतील? खरं सांगतो. आजच्या पिढीला वेळ नाही, त्यामुळे ज्या गोष्टींना आमच्या जगण्यावर फरक पडतो. अशा विषयांनाच आता महत्त्व राहणार, याची जाणीव हवी. इतिहास महत्त्वाचा आहेच. प्रचंड महत्त्वाचा आहे. त्याने खूप काही शिकवलंय. पण त्याचा वर्तमानाशी रिलेव्हन्स. भविष्यात त्याचा कसा वापर करायचा हे सांगायला हवं. याउलट, असंख्य लोक इतिहासातच अडकून बसतात.

अर्थात, ‘ब्रँडीग’ हा भाग महत्त्वाचा ठरतोय. व्याख्याने म्हणजे रटाळ असा जो समज काही प्रमाणात आहे, तो बदलायला हवा. म्हणजे कसं आहे, आम्हाला नाट्यसंगीत ऐक म्हटल्यावर आम्ही ऐकणार नाही, पण, बालगंधर्वांची गाणी ऐक म्हटल्यावर ऐकणार. चूक की बरोबर हा मुद्दा गौण. पण, आज प्रेझेंटेशनलाच महत्त्व आहे, एवढे मात्र नक्की. असो, आम्ही काही ऐकतंच नाही असं नाही. (मिनिटांच्या विश्वास नांगरे-पाटलांच्या भाषणाची क्लिप नेटवर जोमात आहे. अब्दुल कलाम, जॉब्स यांची भाषणंही सो, आम्ही ऐकतोय. पण, फार कमी. दुस-या बाजूला प्रत्येक गावात दररोज एखादे व्याख्यान असतेच. विचारवंतांची संख्या वाढलीय. याचा सुवर्णमध्य काही व्याख्यानमालेतून होतो. तसा तो काल झाला) आणि मला पामराला आनंद झाला. जीभ, डोळे इ. इंद्रियांना इंद्रियसुख आपण सारखे देतोच, तसे ते कानालाही मिळत जाऊ दे आणि प्रगल्भ समाज घडू दे, याच सदिच्छा.

बा वक्त्या, येथून पुढे जेव्हा तू माईकसमोर येशील. माईक ऍडजस्ट करशील. त्याच क्षणी माझे कान मी तुझ्या स्वाधीन केलेले असतील.

एक पॅकेट उम्मीद...!!!

आपल्याला जगायला काय लागते? अन्न, पाणी, छे. मला ते महत्त्वाचे वाटत नाही. आपल्याला जगायला लागते ती आशा, जगण्याची इच्छा. तीच नसेल, तर या सार्याचा उपयोग तरी काय? नाही का... नाहीतर, दररोज फक्त पाट्या टाकणारे लोक आहेतच की आजूबाजूला.

तसं, नवीन वर्ष सुरु झालं की आपण सगळेच नवीन संकल्प करतो, प्लॅन्स बनवतो, जुन्या वर्षाचा आढावा घेतो. यावेळी आपण एक बेसिक प्रश्न विचारुया. ‘जगणं म्हणजे काय?’ किंवा ‘आनंदी जीवन म्हणजे काय?’ उत्तरं अर्थातच वेगवेगळी असतील. ती राहू द्यात तुमच्याकडेच... आपण, काही ‘सच का सामना’ खेळत नाही आहोत. पण, माझं उत्तर मी तुम्हाला सांगतो. आयुष्यातला प्रत्येक क्षणाला पॉझिटिव्हली, आनंदाने सामोरे जाणं म्हणजे जगणं. एखादी गोष्ट पूर्ण अनुभवणं महत्त्वाचं. हसायचं तर भरपूर हसायचं. रडायचं तर भरपूर रडायचं. जे काही करायचं ते मनापासून.

पण, अशी कितीही फिलॉसॉफी झाडली, तरी प्रत्यक्षात हे सगळं १००% जमणं अवघडच. त्यात, गेल्या वर्षात निराशेचे सूर जरा जास्तच आळवले गेले. भ्रष्टाचार, नैसर्गिक आपत्ती, मुंबईतले बॉम्बस्फोट, जागतिक मंदी, असं सारं झाल्यावर चेहरा आनंदी ठेवता येणार नाहीच. अगदी बरोबर. पण, इथे मुद्दा येतो तो ऍटिट्युडचा. हा त्रास तर सगळ्यांनाच झाला. पण, हा त्रास जो जसा झेलेल तसा तो पुढे जाईल. म्हणजे, काही जण ‘आता पुढे काय होणार?’ म्हणत ओरडत राहतील. काही जण ‘जगाचा अंत २०१२ ला होणारच’ म्हणून गप्पा छाटत बसतील आणि, फार थोडे लोक, हे एक कालचक्र असतं. जसं खाली आलंय, तसं वरही जाणार हे ओळखतात आणि त्याच जोमाने काम करत राहतात. अर्थातच, नंतर त्यांना ऍडव्हांटेज मिळते, हे वेगळे सांगणे न लगे.

ही अशी ऍटिट्यूडची गरज मला तर रोज जाणवते. आणि, ‘एक पॅकेट आशा’ किती महत्त्वाची आहे ते पण!!! तरुणच आम्ही, परीक्षा, निकाल, प्रेमात पडणे आणि ब्रेकअप या गोष्टी आमच्यासाठी तर एकदम कॉमन. पण, पुन्हा मुद्दा तुम्ही त्या गोष्टी कशा घेता यावरच डिपेंड... नाहीतर वृत्तपत्रातले वेगवेगळे मधले तुम्ही वाचताच. ही म्हण जुनीच आहे, पण, सध्याच्या तणावाच्या जगात जास्त महत्त्वाची. ‘ग्लास अर्धा भरलेला का अर्धा रिकामा हे तुम्ही ठरवायचं.’

बाकी ८५:१५ तत्व तर आता ‘मॅनेजमेंट गुरु’नी लोकप्रिय केलं आहेच. मलाही पटले ते, ‘आयुष्यात १५% गोष्टी घडणे आपल्या हातात नसते. पण ८५ % गोष्टी मात्र आपण त्यावर तशी प्रतिक्रिया देतो, यावर ठरतात. अगदी खरंच ना... पण, आजकाल ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’ अशा कोर्सेसचे जे पेव फुटले आहे नाक, त्याची मला खरंतर काही गरज वाटत नाही. कारण, मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपण स्वत:मध्ये डोकावूनच बघत नाही. गडबड, धांदल, फेसबुकवरील हजारो मित्र, एसएमएस यात स्वत:ला वेळ दिलाय? आपल्या शरीराला आणि मनाला वेळ दिलाय? तो दिला की सगळं चुटकीसरशी संपतं, मग, हे करण्यासाठी कोर्सला पैसे कशाला घालवायचे बरं???

इन शॉर्ट, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ही आजच्या जगातल्या बर्याच प्रश्नांच्या उत्तराची हिंट आहे. असं मला वाटतं, अर्थात, हे सगळं मला जमतयंच, अशातला काही भाग नाही आहे. पण, हेच जमवायला लागेल असं नक्की वाटतंय. आणि, फुकटचा सल्ला देतोय. वाटला घ्या, नाहीतर सोडून द्या. सिंपल...!!!
म्हणजे, आनंदाची बेट आहेत आपल्या आजूबाजूला. तिथं जायलाच हवं. मग, ते एखादं निवांत उडणारे फुलपाखरु असेल. छानसं गाणं असेल, वा जीवन फुलवणारे ‘मुक्तांगण’, ‘आनंदवन’ सारखे प्रकल्प असतील. नोकरशाहीच्या दलदलीतून वर आलेले ‘ई श्रीधरन’ सारखे लोक असतील. असं बरेच काही. आपली नजर फक्त त्यांच्यावर जायला हवी. गालिबनं म्हटलं आहेच. ‘नजरिया बदलो, नजारे बदल जाएंगे...’

परवा सहज नेटवर कौशल इनामदारचं एक गाणं सापडलं. ‘एक पॅकेट उम्मीद’ आणि तेव्हा लक्षात आले. आपल्या सार्यांना त्याचीच गरज आहे. चिमूटभर आशेची. ती सर्वांना मिळो या नववर्षाच्या सदिच्छा.  

साधी, सरळ गोष्ट

मी काही दिवसांपूर्वी तार्यांचे बेट पाहिला. अर्थात, तो मी पाहणार हे कधीपासून ठरलेले होते आणि, एकूणात तो मला आवडणार हेही जवळपास फिक्स होते. बालगंधर्वचा टाईप जोरात चालू होता. मात्र, काही निवडक लोकांनी या चित्राबाबत लिहिलं होतं आणि तेव्हाच आवडायची खात्री वाटत होती. सुदैवाने अपेक्षाभंग झाला नाही व आवडला, थोडासा वेगळा. तो अनुभव, मनात आलेले विचार शेअर करणं जास्त महत्त्वाचं आहे.

तर, या चित्रपटाची मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो आपल्याशी रिलेट करतो. जवळपास सर्वांशी. कोणाच्या घरात अशीच चित्रपटातल्यासारखी आजी असते, किशोर कदमने रंगवलेल्या एजंटसारखा एजंट कोणाला माहीत असतो. तर, कोणाचा असाच जुना वाडा असेल. माझ्याबाबतीत म्हणाल, तर माझे आजोबा कोकणात ड्युटीवर असताना मुंबईला बोटीनं जायचे. तो अनुभव त्यांनी मला सांगितला होता. तो मला रिलेट झालं, आठवलं... हे असं रिलेट होणं मला फार महत्त्वाचं वाटतं. कला हे खर्या अर्थानं समाजाचं प्रतिबिंब म्हणतात. ते यातून सिद्ध होतं. कारण, आजूबाजूला पाहिलं तर कला म्हणून जे काही दाखवतात त्याचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्षात किती संबंध येतो, देव जाणे!!! जे काही रिफ्लेक्शन येतं ते थोडंसं श्रीमंतवर्गाचं. हा चित्रपट मध्यम, उच्च मध्यम हा फार मोठा क्रॉस सेक्शन कव्हर करतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गणपतीचा एक कॅरॅक्टर म्हणून केलेला वापर. बेस्ट जमलाय तो!!! प्रायोगिक नाटकं बघत असल्यानं रुपकांचा वापर फार जवळून बघतो. पण, ती कळता कळत नाहीत हो..!! पण, इथं. जिंकलस मित्रा. खरंतर, माणूस आणि देव यांचं नातं तसं खूप कॉंप्लिकेटेड आहे. मागं एकदा मी म्हटलं होतं की, प्रेग्नन्सी चित्रपटात दाखवणं (नीट) अवघड, ते काम थ्री इडियट्सनं केलं. तसं हे देवाचं नातं या बेटानं दाखवलं आणि सर्वात महत्त्वाचं, हा सर्वार्थानं चित्रपट आहे.

छायाचित्रण, कलादिग्दर्शन या सर्व अंगांना यात तितकंच महत्त्व आहे. ते जाणवतं, मला त्या टेक्निकॅलिटीजमधलं काही कळत नाही. तरीही, त्याला दिलेला महत्त्व जाणवतो. प्रगल्भ निर्मितीचे हे लक्षण आहे असं मानायला हरकत नाही. त्यामुळे, चित्रपट पाहताना सुसह्य होतो.

आणि, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची साधी, सरळ गोष्ट. ना मेलोड्रामा, ना लाऊडनेस काहीच नाही!!! अगदी साधी, तरल.. मला, हे खूप आवडतं. श्रीयुत गंगाधर टिपरे, गंध, मुंबई-पुणे-मुंबई या मला आवडणार्या काही कलाकृती, आणि, या सर्वांची एकच कॉमन गोष्ट म्हणजे त्यांचे साधेपण. व्यावसायिकतेच्या नावाखाली उगाच मसाला नाही, आणि प्रायोगिक सपकपणा किंवा वैचारिक बोजडपणाही नाही. आलेल्या प्रत्येकाला ही प्रत्येक कलाकृती समजते. आनंद घेता येतो आणि जाता जाता ती फिलॉसॉफिकल डोसही देते, आपल्या नकळत. प्रयोग करु नयेत असं नाही, भपका दाखवू नये असंही नाही. पण, या सगळ्यांपेक्षा आपण सांगतोय ती गोष्ट महत्त्वाची. त्याहून आनंद असा वाटतोय की हे सगळं ‘व्यावसायिक’ चित्रपटात येतंय. ‘गंध’, ‘जोगवा’सारखे क्लास एका बाजूला आहेत (जे तिकीटवारीवर नाहीत.) तर दुसर्या बाजूला ‘गोंद्या मारतंय तंगड’ वा तत्सम मास. दोघांचंही आपलं स्थान आहे. पण, पूर्वी मुंबई-पुणे-मुंबई, इव्हन सनई-चौघडे हे क्लास आणि मासचं कॉम्बो होतं.

ता-यांचं बेट त्याचं पुढचं पाऊल असं म्हणायला हरकत नाही. असो, हा चित्रपट १००% परफेक्ट असं काही नाही. पिटफॉल्स आहेत. असूदेत. गंमतीचा भाग असा की, माझ्या दोन मित्रांना, ज्यांना मराठी चित्रपट बघणं आवडत नाही. त्यांना, या चित्रपटाला घेऊन गेलो होतो, ‘एकता कपूर प्रॉडक्शन’चं नाव सांगून. पिक्चर आवडला नाही तर उठून जाणार अशी धमकी मिळाली होती. त्यांनी चुळबूळ केली, पण, उठून काय गेले नाहीत. तेवढं बासं मला...!!!

नाच मेरी जान

ढिंका चिका, ढिंका चिका... गाणं लागले की पाय थिरकायला लागतातच. नाचण्यात, वेड्यासारखे नाचण्यात गंमत आहे आणि सुदैवाने मला ती गंमत कळाली. गणेश चतुर्थीचा आदला दिवस. कॉलेजमध्ये श्रींचे आगमन होणार होते. वेळ साधारण दुपारी एकची. ताशांचा आवाज ऐकू येऊ लागला आणि मेकॅनिकलच्या प्रेक्टीकलवरुन मी डायरेक्ट रस्त्यावर... कडेला उभा राहून मिरवणूक पाहू लागलो.

नाचायचे ठरवले तर होते, पण अजून गर्दीत जायचे मन होत नव्हते. कसे होणार? तसं मी गणपतीत नाचायचो, पण लिमिटमध्ये. त्यात माझी इमेज... कोण काय म्हणेल इ.इ... पण, मित्रांबरोबर शिरलो गर्दीत आणि अवघ्या ५ मिनिटांत भान विसरुन नाचू लागलो वेड्यासारखा. दमलो की, दोन मिनिटे थांबायचे आणि मग पुन्हा सुरु... आरडाओरड, दंगा, खांद्यावर चढणे.. सारे काही... आजूबाजूला असंख्य मुली आणि शिक्षक आपल्याकडे बघत आहेत, फोटो काढत आहेत, हे माहीत असूनही... जवळपास ३ तास नाचलो आणि खरं सांगतो, मनाला शांतता मिळाली.
फ्रेश झालो... दमल्यावर जेव्हा कट्ट्यावर बसलो, तेव्हा तो आनंद मला माझ्याच चेहर्यावर दिसला. नवीन काही गवसले, त्यावर तेव्हा भवताल नावाचा लेखही लिहिला. यावर कहर म्हणजे, दुसर्या दिवशी एक पोरगी ‘एफ बी’ वर चेष्टेत म्हणाली, छान नाचलास हां तू. ते काहीही असो. एक नवा मार्ग मिळाला. नाचणं, बेभान होणं आणि जगाची पर्वा न करता आपल्याच विेशात गुंग होणे. गॅदरिंग आले, गॅदरिंगला तर खास डी.जे.ची सोय. पण, मी मात्र स्टेजवर... स्टेज कमिटीत पहिल्या दिवशी सगळ्यांना नाचताना पाहिले आणि दुसर्या दिवशी मीही हळूच त्या गर्दीत सामील झालो.

खुर्च्या लोखंडाच्या होत्या म्हणून ठिक. एकाच बंदीस्त हॉलमध्ये २००० मुले एकाच वेळी नाचत आहेत. फार गजब एक्स्पीरीअन्स असतो तो..!! अगदी गॅदरिंगनंतर जेवतानाही आम्ही थिरकत होतो. अर्थात, त्या रात्री खूप शांत झोप लागली, हे वेगळे सांगणे न लागे! वर्गाची ट्रीप, गाडीत डी.जे. बनवलेला... येताना त्या अवघ्या २ फुटांच्या जागेत ५० जण नाचू लागलो. सरांनाही ओढले मग.. पोरींचा आणि पोरांचा ग्रुप वेगळा. २ तास पूर्ण धमाल. ही खरच एक अनएक्स्पेक्टेड ट्रीट होती. भरपूर मजा आली. गाडीतून उतरलो... रंकाळ्यावर गेलो सगळे मित्र आणि तिथे पहिल्यांदा रोमँटीसिजम अनुभवला. चंद्र, शांतता, मित्र इ.इ...आणि एखादी गोष्ट कशी भिनवावी होतो नाच पुन्हा शिकवून गेला. याहून कहर म्हणजे, इयर एंडचा कार्यक्रम. वर्गातला छोटेखानी कार्यक्रम तो. पण आनंद सेलिब्रेट करण्यासाठी नाचणं इतके मस्ट झालेले की, तिथल्या स्पीकरवर मोबाइलची गाणी लाऊन नाच सुरु. पोरांनी मधल्या काळात मला केक फासलेला, पण त्याच शर्टवर मी नाचत बसलेलो. सरांनी आता बास म्हणेपर्यंत आम्ही नाचतच राहिलेलो.

हुश्शऽऽ गेल्या वर्षभरात नाच हे कॉलेज लाइफमधला एक महत्त्वाचा हिस्सा बनून गेला होता. सगळ्यांचाच. खूप जणांसाठी ते अगदीच नैसर्गिक होते. पण, माझ्यासाठी जरा जास्तच महत्त्वाचे. नाचणं म्हणजे फक्त थिरकणं नव्हे; ती झिंग महत्त्वाची, ते बेभान होणे महत्त्वाचे. असे बेभान होणे जमले की, एखाद्या ध्येयामागे पिसाटल्यासारखे धावता येते.ऍटिट्यूड येतो तो अंगात. आपली इमेज, भवताल, कोण काय म्हणेल याचा खूप विचार करतो आपण. पण, हे नाचणे म्हणजे स्वतःसाठी जगणे. कोण मुर्ख म्हणो वा आणखी काही... हे जगणे म्हणजे नाचणे. मग नाचताना आपण कितीही वाईट दिसत असलो तरी... फक्त नाचणे नाही; ऊर फुटेस्तोवर नाचणे. अंग चोरुन काम करणे नाही. म्हणूनच, नाचणे म्हणजे तरुणाई, नाचणे म्हणजे जल्लोष. एक रीफ्रेशिंग डोस. त्यामुळे अधूनमधून नाचावं. कारण असो वा नसो.. तेवढे स्वतःचे २ तास पुढचे काही महिने तरी पुरतात. माझे भाग्य की, मला हा मार्ग सापडला आणि म्हणूनच म्हणावे वाटते, नाच मेरी जान...

प्रेमाच्या गोष्टी...

‘एक लडकी थी दिवानीसी...’ ‘मोहबत्ते’मधलं वाक्य. मला प्रचंड आवडतो. तो संपूर्ण चित्रपटच. मान्य आहे, तो तद्दन फिल्मी आहे. पण, आय एम कनेक्टेड. ती जिद्द, ध्यास आणि एका अनोख्या प्रेमाची कहाणी. हे फालतू आहे, असं मनाला बजावत राहूनही आवडते. ‘वेकअपसिर’... हा माझा स्ट्रेसबस्टर चित्रपट आहे. कधीही कंटाळा आला, टेन्शन आलं की पीसीवर हा चित्रपट लावायचा.

यातली लव्हस्टोरीही मला जाम आवडते. विशेषत: तो शेवटचा तरल असा प्रसंग. मी स्वत: काही बाही लिहीत असतो. त्यामुळे तर मला तो जास्त भिडतो आणि त्यातली फिलसॉफी, ‘जगण्याच्या गडबडीत थोडं मागे वळून पाहा’ म्हणून सांगणारी एक मॅच्युअर प्रेम... असाच अजून एक, ‘दिल के पास का’ चित्रपट, म्हणजे, मुंबई-पुणे-मुंबई. आतापर्यंत मिनिमम ६० वेळा तरी पाहिलाय. आई शप्पथ!!! स्वप्नील-मुक्ताच्या जोडगोळीचा तर मी फॅन आहेच. पण, आवडते ती ‘साधी, सरळ गोष्ट...’ नो मेलोड्रामा, नो फाईट्स. नथिंग, पण, परिणाम मात्र जबरी. ‘मुलगी बघण्याचा एक वेगळा प्रयोग.’ याबाबत मी आधी लिहिलंही. पण, परत परत लिहावं वाटतं. सो क्युट. हल्ली इंग्लिश पुस्तकं जरा जास्तच वाचतोय. तिकडं चेतन भगत स्टाईलचं प्रचंड फॅड आलंय.

एखादी कादंबरी लिहायची, त्यात अश्‍लीलतेच्या जवळ जाणारे शब्द, तरुणाईची भाषा वगैरे वापरायची आणि ७०-८० रुपयांत खपवायची. फिलपकार्टवर अशी साठेक पुस्तकं सापडली मला. असो, तर मुद्दा असा की, त्याच पठडीतलं एक नवं पुस्तक हाती लागलं परवा. ‘इट्स नॉट फॉरेवर, इट्स नॉट लव्ह.’ प्रणय, शिव्या, अश्‍लीलता, सगळा मसाला होता त्यात. पण, त्याहून महत्त्वाची एक गोष्ट होती, ती म्हणजे कथा. ‘फ्लॉप्लेस... अत्युत्तम. प्रेमातच पडलो मी त्या पुस्तकाच्या. ते ‘क्रिपी’ आहे हे माहीत असूनही. वर्षापूर्वी असंच अजून एक वाचलेलं. ‘बरं आय लव्ह यू...’ म्हणून. संदीपची ‘हृदय फिकले...’ सारखी कविता ऍकॉनचं एक गाणं ही या वरच्याच लिस्टमधली काही उदाहरणं. आता हे एवढं सगळं वाचल्यावर दोन गोष्टी झाल्या असतील. काहीजण गालातल्या गालात हसले असतील तर, काहींना मला वेड लागलंय का? असा प्रश्‍न पडला असेल. ज्यांना हा प्रश्न पडला, त्यांचं उत्तर एवढेच की ‘बॉस, आज का तारीख तो देखो.’ आज ‘प्रेम दिन’ आहे ना. सो, थोड्या, प्रेमाच्या गोष्टी केल्या. हां, आता हा दिवस साजरा करावा का, वगैरे वैचारिक मुद्दे आहेत. पण, तो विचार करुन काय फायदा. कारण, विचारवंतांनी कितीही सांगितलं तरी आम्ही तरुण ते ऐकतो थोडीच??? सो, बाजूला ठेवा. हां, खरंखुरं प्रेम एवढं फिल्मी नसतं, ते मात्र खरं! खरंतर, हा दिवस म्हणजे हे भान ठेवण्याचा दिवस.

प्रेम म्हटलं की, कॉम्प्लिकेशन आलीच! कारण, जगात सहज काहीच मिळत नाही. राईट? आणि, खरी गंमत त्यातच आहे ना... म्हणजे, मला ती प्रेम व्यक्त करतानाची धडधड, थ्रील, आनंद याचे जे मिक्चर आहे ना, त्याबाबत फार असुया आहे. एखाद्या व्यक्तीबाबत एवढे डेडिकेटेड असणं हीच मला एक मोठी गोष्ट वाटते. अर्थात, आजकाल सगळाच बाजार झालाय. कपडे बदलल्यासारखे मुलं-मुली जी.एफ./बी.एफ बदलतात. असुया, प्रेमावरुन होणारी भांडणं, उगाचचा भाबडेपणा, दिखाऊपणा, अकारण शारीरिक जवळीक आणि दुर्दैवाने याचे प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यामुळे ‘प्रेम’ या निर्मळ भावनेलाच धक्का बसतोच. आज आपण फक्त एवढंच ठरवलं तर? की आपण असं वागू की जाने या वैश्‍विक भावनेला धक्का लागणार नाही. हे खरं सेलिब्रेशन नसेल का? मग, बिनधास्त हा डे सेलिब्रेट करु. फक्त आपल्या भावनांशी प्रामाणिक राहून नाही का? चलो, ‘जास्त बोअर करत नाही, तुमचे प्लॅन ऑलरेडी ठरले असतीलच. मी अजून ‘सिंगल’ असल्याने मी निवांत आहे. म्हणूनच एवढं लिहिलं ना! काही वेड्या गोष्टी, वेड्या कलाकृती, मला आवडणार्‍या. कारण, प्रेम हे वेडच असतं.’ या जगण्याच्या प्रवासात तुमच्या माझ्या जीवनात प्रेमाचा बहर येवो, या सदिच्छांसह हॅपी व्हॅलेंटाईन डे.

थर्ड आय...

गेल्या काही दिवसात २ पुस्तके वाचली. ‘लवासा’ आणि ‘जैतापुरची बत्ती’ म्हटलं तर दोन्ही पुस्तकं वेगळी, म्हटलं तर बेस सारखाच.... दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आणि दोन सर्जनशील माणसांना (त्यातही एक अखंड आणि एक पत्रकार) त्याबद्दल लिहावं वाटणं आणि त्यासाठी अभ्यास करुन ते लिहिणं ... हे असं वाटणंच महत्त्वाचे आहे.

आजकाल.... नाहीतर, आपल्याला काय त्याचं म्हणून, मेंदू बाजूला काढून काठावर बसणंच वाढलंय.सो,अभिनंदन बोथ ऑफ यू..... प्रगतीचा मार्ग धरायचा असेल, तर हे दोन्ही प्रकल्प व्हायला हवेत. यात तशी शंका नाही. याला संपूर्ण विरोध केला तर, आपण काळाच्या पाठीमागे राहू, यात शंका नाही. प्रश्‍न आहे तो ते कसे व्हावेत याचा. या दोन्ही प्रकल्पांना विरोधक आहेत. आता विरोधाचे मुद्दे वगैरे नंतर तपासता येतील. पण, आग असल्याशिवाय धूर निघत नाही. सो, काही ना काही मुद्दे असणारच आणि त्याचा विचार व्हायला हवा. कारण, हे सारे प्रश्नच नवा मार्ग तयार करणार आहेत. ‘लवासा’मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स येत आहेत, तर ‘जैतापूर’च्या अणुभट्टीची कंपनी आहे, तिथे जगातले एकूण प्रकल्पच कमी असे मुद्दे आपली संस्कृती ठरवत असतात. सो, ‘सुवर्णमध्य’ हा कुठे तरी साधायची गरज आहे, हे मात्र स्पष्ट दिसतंय. पण, खरं सांगू का, खरं काळजीचे कारण हे नाहीच; ते आहे ते सिस्टीम. मान्य आहे, की ती कॉम्प्लिकेटेड असणार... पण, नक्की किती गुतांगुंतीची! हा कायदा, तो कलम ... निम्मी एनर्जी ही परवानगी घेण्यातच वाया जाणार. हे सोपं करता येणार नाही का? कायदा, मग कायद्याला येणार्‍या पळवाटा आणि मग तिथे निर्माण होणारी भ्रष्टाचाराची पायवाट. काही तरी करायला हवं! टेक्नॉलॉजी या सगळ्याला मदतगार ठरु शकेल? विचार करायला हवा...! महत्त्वाचं म्हणजे, हे सगळं लोकांपर्यंत सहज पोहोचायला हवं, समजायला हवं आणि ते सगळ्यात अवघड वाटतंय. ऍक्चुअली, आजकाल माध्यमांच्या या जमान्यात प्रत्येकजणच विचारवंत झाला आहे. आणि, अभ्यास असता, नसता प्रत्येक विषयावर बोलू लागला आहे. आणि, त्यातून तयार होतोय तो फक्त केऑस... आणि बघणा-‍या, ऐकणा-‍याला कळतच नाहीय नक्की काय चाललंय ते.

अर्धज्ञान अज्ञानापेक्षा वाईट असतं म्हणतात. आणि, म्हणूनच ख-‍या गोष्टी जनतेपुढे येणं आवश्यक आहे. नाहीतर मग, हत्ती आणि सात आंधळे यांच्या गोष्टीप्रमाणे गत होते. प्रत्येकाला जसं जाणवतंय तेच पूर्णसत्य असा प्रकार होऊन बसतो. आणि, तुम्ही, आम्ही, आपण, सगळे तरी या गोष्टींबाबत कितपत सीरीयस आहोत? अर्थात, रोजीरोटीच्या भानगडीत हे सगळं समजावून घेणं अवघडच. पण, कटाक्ष तरी हवाय. समाजाची म्हणून जी वैचारिक पातळी आहे, ती वाढवण्याची ही एक उत्तम संधी आहे. आपण ती घेतोय का? या विषयांवर गावोगावी, जिल्ह्याजिल्ह्यात चर्चासत्रे व्हायला हवीत, त्याचा विविध अंगांनी अभ्यास व्हायला हवा. कितपत होतोय तो? आणि, हे सारं होत असेल तर ते एका मर्यादित क्रॉस-सेक्शनपर्यंत सीमित तर नाही ना? आपण सगळेच सुस्त व्हायला नको, एवंढच वाटतंय मनापासून... आपण विचार केला किंवा नाही केला, म्हणून हे प्रकल्प व्हायचे थांबणार नाहीत. यात, गुंतलेला पैसाही एवढा आहे की, विरोध झाला तरी हे सारं उभं राहणारच. मग मुद्दा हा आहे की, या सा-‍यातून आपण काय बोध घेतो, काय शिकतो? कारण, आपल्या भविष्याची दिशा आपण कसं रिऍक्ट होतो, यावर ठरते. शेवटी काय, आपल्या विकासाचे होकायंत्र दुसर्‍या कोणाच्या हातात न जाता आपल्याच हातात रहावे एवढीच इच्छा...

आयडिया' है क्या???

आजच्या जमान्यात नक्की कशाची चलती आहे? मध्यंतरी मला हा प्रश्न पडला होता. तेव्हा जरा इकडे-तिकडे नजर टाकली. तर असं जाणवलं की, पैसा, सत्ता, ताकद यांची चलती असायचा जमाना केव्हाचा गेला. आज जमाना आहे तो नवनव्या संकल्पनांचा, इन शॉर्ट, डोकॅलिटीच... मग, बाकीच्या गोष्टी आपोआपच येतात. फेसबुक हे त्याचे अत्युत्तम उदाहरण. फेसबुककडं स्वतःचं असं काहीही नाही. माणसांचीच माहिती, त्यांच्याच गप्पा... फक्त, त्या सार्यांना जोडणारी एक भन्नाट आयडिया. आज जेव्हा फेसबुक शेअर मार्केटमध्ये आलं, तेव्हा त्याची एवढी किंमत झाली की ती मोजतानाच डोळे पांढरे व्हायची वेळ येते. आजच्या जमान्यात एखाद्या `कन्स्पेट'ला मिळालेला हा कदाचित सर्वात मोठा आर्थिक सन्मान. अशीच एक गोष्ट परवाच भारतात पण घडली. दोन बहीण-भावांनी मिळून एक वेबसाईट तयार केली. थोडा काळ `डेव्हलप' केली. आणि, परवाच एका मोठय़ा कंपनीला विकून टाकली. किंमत होती फक्त 600 कोटी.

सध्या रश्मी बन्सलचे `स्टे हंग्री, स्टे फुलीश' वाचतोय. अशाच जवळपास 30 उद्योजकांच्या कहाण्या... बाकी सारे मुद्दे आहेत. पण, या सार्यांच्या डोक्यात असणार्या भन्नाट आयडिया हा त्यांच्या यशातला सगळ्या मोठा भाग. कोणी किराणा माल कमी दरात विकला, तर कोणी नोकर्यांचा शोध नेटवर घेणे सोपे केले. मग गेल्या 20 वर्षांत त्यांची भरभराटच झाली.

 अर्थात, आर्थिक फायदा मिळवणे, एवढेच म्हणजे यश नव्हे. आजची खरी ताकद ही अक्कल असणारा सामान्य माणूस झाली आहे. त्याचे डोके लावून तो आज अनेक छोटे-मोठे प्रश्न सोडवत आहे. लोकांचे भले करत आहे. आणि, मानसिक समाधान मिळवत आहे. कोणाच्या तरी डोक्यात आले. टॅक्सीवाल्यांना विरोध का करु नये, त्यातून `मीटर डाऊन' आले. तर कोणाच्या डोक्यात समारंभात अन्न वाया जाऊ नये म्हणून काही आयडिया येते. तर कोण, शेतकर्यांसाठी एसएमएस सेवा सुरु करतो. असे असंख्य सामाजिक उपक्रम आज जोरात सुरु आहेत, आणि त्याने काही प्रश्न थोडेफार का होईनात सुटत आहेत.

अशा सगळ्या नवनवीन उपक्रमांना `स्टार्ट अप्स' असं नाव दिलं गेलंय. आणि, त्यांची संख्या झपाटय़ानं वाढत आहे. त्यांच्या स्पर्धा होत आहेत. आयआयटीचे `आयडिएट' ही त्यातली एक मानाची स्पर्धा. महिंद्रा, टाटा अशा कंपन्यांनाही फक्त माणसे नको आहेत. त्यांना, हव्या आहेत त्या नव्या कल्पना. प्रत्येकाने स्वतःची स्पर्धा काढली आहे.

तिथं जाऊन आपण एकच काम करायचं; जर आपल्या डोक्यात एखादी कन्सेप्ट असेल, जी समाजाच्या कोणत्याही भागात किंवा अगदी एखाद्या कंपनीत थोडा बदल घडवू शकत असेल किंवा तुम्ही काहीतरी नवीन, वेगळी गोष्ट तयार केली असेल, तर ती सांगायची. जर त्यांना ती आवडली, तर मार्गदर्शन सगळं त्यांचं. तुमचं फक्त डोकं, आणि काय हवं??

अर्थात, नव्या कल्पनांना पूर्वी कधी संधी नव्हतीच, असं काही नाही. पण, आज ती मोठय़ा प्रमाणावर वाढलीय एवढं नक्की. अर्थात, त्याला कारणेही बरीच आहेत. आता ज्ञानावर कोणतीही बंधने उरली नाहीत. एखादा आफ्रिकेतला माणूस जपानच्या माणसाला त्याची आयडिया सांगू शकतो, आणि तो जपानी युरोपीय माणसांना बरोबर घेऊन ती अंमलात आणू शकतो. थोडक्यात, मनाच्या धावेला आता कोणतेही बंधन नाही, आणि अशावेळी मनाची धाव ही कायम चार हात पुढे असते. ज्ञानाच्या महासागरात आपल्या मेंदूची करामत सोडली की झालं. त्यात ना डिग्री आड येते, ना गाव. आणि, म्हणूनच प्रत्येक देश हा नव्या संकल्पनांमागे धावत आहे.
इथं मला अरुण देशपांडेचं एक वाक्य आठवलंय, ते म्हणाले, `आपल्याला शारीरिक नव्हे, तर बौद्धिक आळस आलाय.' पटलं मला ते. कारण, आपल्याकडे पेटंट मिळविण्यासाठी स्पर्धा लागायच्या ऐवजी डिग्री आणि जॉब मिळवायसाठी स्पर्धा लागलेली आहे. ती असावीच; पण थोडं इकडं लक्ष द्यायला काय हरकत आहे? अगदी जाता येता आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात. पण, `याचं पुढं काय होणार?' असं म्हणून आपण तो विचार सोडून देतो. बरं, दोस्त यापुढे असा विचार सोडून द्यायच्या आधी होल्ड ऑन, कदाचित तोच तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतो. कारण येथून पुढे लोक `डिग्री है क्या?' विचारायच्या ऐवजी `आयडिया है क्या?' असं विचारु लागतील. तीच काळाची गरज होत चाललीय. सो, `गेट ऍन आयडिया सरजी...'