मंगळवार, ४ जून, २०१३

‘बुक’ कि बातें

 २३ तारखेला ‘जागतिक पुस्तक दिन’ झाला. त्यानिमित्ताने पुस्तकविश्वाबद्दल बरीच साधकबाधक चर्चा झाली आणि ती व्हायलाच हवी. कारण कितीही जग बदलले, तरी पुस्तकं आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत आणि राहणार. पुस्तकं खपत नाहीत वगैरे गोष्टी तर केव्हाच खोट्या ठरल्यात. परवा, मुंबईत पुस्तके घ्यायलाय तासाभराची रांग लागली होती. प्रदर्शनातही जोरदार विक्री होते हे सगळे पुरेसे बोलके आहे. अर्थात, नक्की काय विकले जाते हा कळीचा मुद्दा आहे. परवा, ‘मटा’च्याच संपादकीय पानावर अरुण टिकेकर यांनी त्याबद्दल आणि एकूणच मराठी पुस्तकविश्वाबाबत खूप छान विवेचन केलं होतं. ते मुळातून वाचण्याजोगं आहे.

यानिमित्ताने एक प्रश्न समोर येतो तो असा की, ‘साहित्य हे त्या - त्या काळाचे प्रतिबिंब असते असं म्हणतात. मराठी पुस्तकांबाबत ते घडतंय का? मराठीत किती तरुण लेखक आहेत? आता, एखादं नाव आठवा असं म्हटलं तर ते आठवतंय का? धर्मकिर्ती सुमंत, निपुण धर्माधिकारी, मनस्विनी लता रवींद्र ही त्यातल्या त्यात आजच्या पिढीचं जगणं मांडणारी काही नावे, पण यातलीसुद्धा बरीच जण नाटक आणि सिनेमाच्या फॉर्ममध्ये लिहिणारी. असं का असावं? तुलना करणं योग्य नाही, पण मागच्या वर्षी सहज एक अभ्यास केला होता. तेव्हा मला इंग्रजीमध्ये ५०-६० तरुण लेखक सापडले होते. ही संख्या रोज वाढती आहे. सगळे झाडून कादंबरीलेखक. ‘फ्लिपकार्ट डॉट कॉम’च्या पुस्तक विभागात कधी गेलात सहज तर हे सगळं सहज दिसून येईल. यात कित्येक मराठी नावेदेखील आहेत. हे सगळे मराठी येत असूनही इंग्रजीतच का बरं पुस्तकं लिहित आहेत?
अर्थात आजच्या जगण्याचे संदर्भ यायला तरुणच असायला हवं, अशातला काही भाग नाही, पण आत्ताचे जे लेखक आहेत त्यातले कितीजण आजची पिढी समजून घेतात? कविता महाजन, संजय जोशी, चं. प्र. देशपांडे अशी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी नावं सोडली तर कित्येक लेखक अजून इंटरनेटवर अॅक्टिव्ह नाहीत. मग, आमची लाइफस्टाइल समजून घेणं लांबच... आणि जर का ते समजलं नाही तर आमचं जगणं लिखाणात कसं उतरणार? जर का कधी हाय-एंड मोबाइल पाहिलाच नसेल तर एखाद्या एसएमएसला रिप्लाय न केल्याने काय रामायण घडू शकते, हे त्यांना कसे कळणार? मग तरुणाईचा कल मृत्युंजय, स्वामी, कोसला इथपर्यंतच वा फारफार तर आत्मचरित्रांपर्यंत मर्यादित राहतो यात नवल ते काय?

हे झालं कन्टेन्टबाबत. मग, पुढची ओघाने येणारी गोष्ट म्हणजे मांडणी, अर्थात प्रेझेंटेशन. एका बाजूला इंग्रजीमध्ये १०० रुपयांत २५०-३०० पानांची कादंबरी मिळत असेल, तर मग मराठीतले पानाला एक रुपया अशा दराची पुस्तके आम्ही पोरं कशाला उचलू? पेपरबॅक, पुस्तकांचे वेगवेगळे साईजेस अशा प्रयोगात आपण फारसं काही केलं आहे, असं दिसत नाही. त्यात आपण आपली एक आवृत्ती काढतो हजार पुस्तकांची. एवढी कमी? आणि ती संपत नाही म्हणून ओरडतो. पण दुसऱ्या बाजूला काही पुस्तकांच्या नेटवरच्या ‘प्री-ऑर्डर’ची संख्याच हजाराहून जास्त असते. पुस्तकांची किंमत कमी ठेवून क्वांटीटीवर खेळण्याचे काही प्रयोग करता येऊ शकतील का? अच्युत गोडबोलेंच्या ‘मुसाफिर’नं तो यशस्वी करून दाखवला आहे. शिवाय लेखकांच्या ‘बुक शॉप्स’ना भेटी... गप्पांचे कार्यक्रम असे ब्रँडिंगचे बरेच प्रकारदेखील ट्राय आउट करण्याजोगे. कमी खपणारं म्हणजे इलाईट, क्वालिटीचं लिखाण ही संकल्पना खरी बदलायची गरज आहे. क्वालिटी आणि क्वांटीटी हातात हात घालून जाऊ शकतात.

एका अभ्यासवृत्तीच्या निमित्ताने सध्या ई-साहित्याचा अभ्यास सुरू आहे. मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव, मी-मराठी अशा मोजून पाच संकेतस्थळांवर मिळून अक्षरशः लाखो पानं मराठी लिखाण आहे आणि त्यातलं बरचसं नक्कीच दर्जेदार आहे. त्या लिखाणाला पुस्तकरूपात आणायची आयडिया अजून कोणाला कशी काय सुचली नाही याचं आश्चर्य वाटतं. आपण आपले ई-बुक्सचे कौतुक करण्यात मग्न. नव्या तंत्राचं कौतुक हवंच, पण नव्या-जुन्याचा मिलाफ झालाच तर लोकांच्या उड्या पडतील.

हे सगळं सांगायचं कारण इतकंच की वाचनसंस्कृती, पुस्तकसंस्कृती डेव्हलप करायला लागते. त्याबाबतीत आम्ही पोरांना सांगणारं कोण आहे? त्यामुळे आम्हाला चेतन भगतच ग्रेट वाटतो. कारण, त्याच्याही पुढं बरंच काही आहे, हे माहीतच नसतं.

अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आजची पिढी, काळ आणि पुस्तकांची सांगड घालणाऱ्या...
पण, एक मात्र खरं की, हातात नवं कोरं पुस्तक आल्यावर येणारा सुवास आणि फिलिंग मात्र चिरंतन राहणार आहे...

विनायक पाचलग
(पुर्वप्रसिद्धी , दै.महाराष्ट्र टाईम्स )